--
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना हुतात्मा बाबू गेणू सागर (डिंभे धरणातील) पाणी १६ गावांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत कळमजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी १३ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.
गवारी म्हणाले की, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने डिंभे धरणातील पाणी शेतीसाठी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याच्या अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत सदर कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त करण्याच्या अटीवर महामंडळाने सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश दिले आहेत.
डिंभे धरणातील पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्तावित कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करणे यासाठी प्रस्तावित कामाची निविदा किंमत ३८ कोटी ४९ लाख रुपये असून सर्वेक्षण ठोक तरतूद सन २०२०-२१ मधील उपलब्ध तरतुदीपैकी १३ लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर कामास शासन निर्णयानुसार कामाची निविदा काढण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पत्रानुसार शासनास सादर केला आहे. शासन वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार २५ टक्के निधीच्या मर्यादेत नव्याने अर्थसंकल्पीत करावयाचे बांधकामे निर्मितीची कामे घेता येतील, असे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर कामांना मान्यता देण्याबाबत मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
--
या गावांना होणार फायदा
जलसंपदा मंत्री यांच्या निर्देशानुसार आदिवासी विभागाकडून निधी प्राप्त करून घेण्याच्या अटीवर महामंडळाच्या सर्वेक्षणच्या ठोक तरतुदीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या जलसिंचन योजनेमुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे, कोंढवळ, तेरुंगण, राजपुर, तळेघर, फलोदे, जांभोरी, चिखली, मेघोली, पोखरी, राजेवाडी, गोहे खु.,गोहे बु.,भीमाशंकर, म्हतारबाचीवाडी, नांदुरकीचीवाडी या गावांना फायदा होणार आहे.