तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पाटण खोऱ्यामध्ये असलेले डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झपाट्याने कोरडे होऊ लागले आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यावर्षी या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरले होते. या पाणलोट क्षेत्रामुळे या परिसरातील पाटण, म्हाळुंगे कुशिरे खु, कुशिरे बु., मेघोली, बेंढारवाडी ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील आदिवासी शेतकरी हा उपसासिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला. या पाणलोट क्षेत्रातून पाणी उपसा करून बाजरी, गहू, बटाटे, कांदे, मेथी, कोथिंबीर यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला. परंतु जसजसे डिंभे धरणातील पाणी कमी होऊ लागले तसतसे हे पाणलोट क्षेत्र ओस पडू लागले आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व पाटण खोरे हे मुसळधार पावसाचे माहेर समजले जाते. चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी लोकांना दुष्काळाचे हाल सोसावे लागत होते. परंतु मुसळधार पावसामुळे म्हाळुंगे-कुशिरेदरम्यान असणारा डिंभे धरणाचा फुगवटा हा मोठ्या प्रमणात भरला जातो. त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रामध्ये पाटण पिंपरी हद्दीमध्ये छोट्या छोट्या पद्धतीने कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडवले जाते व त्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून उपसासिंचन करून या भागामध्ये बागायती पद्धतीची शेती केली जात आहे. परंतु यावर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला व यामध्ये पूर्व भागासाठी कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे हे पाणलोट क्षेत्र आता कोरडे होऊ लागले आहे.आम्हा आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागामध्ये उपसासिंचन योजना लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी या भागातील आदिवासी शेतकरी महादू मावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ते म्हणाले, की यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच शेतीचाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल. (वार्ताहर)
डिंभे पाणलोट क्षेत्र होतेय कोरडे
By admin | Published: April 24, 2017 4:31 AM