मढ : जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे एका बालकाला ठार करणाऱ्या बिबट्याच्या मादीला आज पहाटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे़ गेल्या तीन महिन्यांत जुन्नर तालुक्यात जेरबंद करण्यात आलेली ही दुसरी मादी आहे़ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच असून त्या हल्ल्यांमध्ये पाळीव प्राण्याबरोबरच पांगरीतर्फे मढ येथे एक महिला, खामुडी व डिंगोरे येथे प्रत्येकी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आणे-माळशेज पट्ट्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. या दहशतीमुळे वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावले गेले. त्यातच रविवारी (दि. ३ मे) डिंगोरे येथे बिबट्याने बालकाला ठार केल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ नगर-कल्याणवर रास्ता रोको करून आंदोलन केले. या सर्व घडामोडींमुळे वन विभागाने डिंगोरे परिसरात ८ पिंजरे लावले. त्यातीलच वरखडेवस्ती येथे डहाळे फार्म हाऊसमागे शांताराम नामदेव नायकोडी यांच्या शेतात पिंजरा लावला़ तेथे भक्ष्य म्हणून शेळी ठेवण्यात आली होती़ पिंजऱ्यासमवेत वनपाल साळुंखे, एस़ जी़ मडके, एस़ सी़ मोडवे यांचे पथक गस्त घालत होते़ आज (गुरुवार, ७ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना शेळीचा आवाज ऐकू आला़ त्यांनी पिंजऱ्याजवळ जाऊन पाहिले, तर बिबट्याची एक मादी जेरबंद झाली होती़ या मादीने शेळीला पंजा मारल्याने ती जखमी झाली आहे़ त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना त्वरित दूरध्वनीवरून कळविले. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, खेड विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस आले़ त्यांनी या मादीला रेस्क्यू व्हॅनने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात पाठविले. (वार्ताहर)
डिंगोरेत बिबट्या जेरबंद
By admin | Published: May 08, 2015 5:20 AM