पुणे: पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदीचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी ११ पर्यंतच अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. पण काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मंडई परिसरात असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. श्री बालाजी प्रोव्हीजन स्टोअर्स असे दुकानाचे नाव असून ते सील करण्यात आले आहे.
सकाळी ११ पर्यंतच परवानगी असतानाही दुकान त्यानंतर चालू होते. तसेच दुकानाबाहेर सोशल डिस्टनसींगचे नियम पाळले जात नव्हते. हे सर्व पाहून सकाळी ११.३० च्या सुमारास थेट कारवाई केल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. त्याबरोबरच दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
पुणे महानगरपालिकेकडून संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे. असे वारंवार आवाहन केले जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. तरीही त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याने पालिकेला कारवाई करावी लागत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पण मृत्यू संख्येत मात्र अजिबात घट होत नाहीये. नागरिक अजूनही बेड मिळवण्यासाठी झगडत आहेत. सर्वत्र अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाला गांभीर्याने घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.