पिंपरी: सद्यस्थितीत पिंपरी शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. दररोज नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेक जण तर विनामास्कही फिरत आहेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. असे प्रशासनाने सांगितले आहे. तरी सकाळच्या वेळेत दापोडी येथे असंख्य नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. दापोडी पोलिसांनी यावर नवीन फंडा चालू केला आहे. दापोडीतील प्रमुख चौकात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. काही कारण नसल्यास पोलीस त्यांची अँटिजन टेस्ट करत आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. त्यांनाही सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सायंकाळी सहा नंतर सर्वत्र संचारबंदी असल्याचे आदेशात नमूद केले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी बाहेर ना पडण्याचे आवाहन केले जात आहे.
परंतु दापोडीत नागरिक विनाकारण बाहेर पडल्याचे चित्र सकाळपासून दिसू लागले आहे. त्यामध्येही त्यांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसून मास्क ना घालता सगळीकडे फिरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईचा बडगा नागरिकांवर उगारला आहे. आज रात्रीपासून निर्बंध अजून कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दापोडी पोलिसांचा अँटिजन टेस्ट नवीन फंडा
आज सकाळी शहरात सगळीकडेच नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. त्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. अशा वेळी दापोडी पोलिसांनी नागरिकांना कारणे विचारण्यास सुरुवात केली. विनाकारण फिरणाऱ्या लोकांची अँटिजेन टेस्ट केली आहे. त्यामुळे नागरिक आता विनाकारण बाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत.