पुणे : वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रीडिंग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रीडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल व महावितरणमध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांना काम मिळणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिला.
वीजमीटरमधील सदोष रीडिंग व चुका टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गणेशखिंड, रास्ता पेठ व पुणे ग्रामीण मंडल तसेच सातारा, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली मंडलनिहाय मीटर रीडिंग एजन्सीच्या कंत्राटादारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अधीक्षक अभियंता (संचालन) शंकर तायडे, पंकज तगलपल्लेवार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण, सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) माधुरी राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) राहुल पवार आदी या वेळी उपस्थित होते.