पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात ऑल आउट ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान १२९ कारवायांमध्ये तब्बल १६५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. स्वत: पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावर उतरून या ऑपरेशनची पाहणी केली. पोलिस आयुक्तांनी शिवाजीनगर, खडक, खडकी, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिस चौकींना भेट दिली. यावेळी त्यांनी नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये हॉटेल, लॉजेस, धाबे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. यात अपर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपआयुक्त अमोल झेंडे, उपआयुक्त संदीपसिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
- या ऑपरेशनमध्ये एकूण १९९४ गुन्हेगार तपासण्यात आले, त्यापैकी ६९५ गुन्हेगार मिळून आले. त्यातील २४ जणांना आर्म ॲक्टनुसार अटक केली असून, त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि २३ धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आली.- अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक करून गांजा आणि अफीम, असे १ लाख ७५ हजार रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले. गुन्हे शाखेने १४ आणि पोलिस ठाण्याने १५९ केसेस करून ८५ लाखांची गावठी दारू जप्त केली. जुगार खेळणाऱ्या ५५ आरोपींना अटक करून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.- गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांची पथके कारवाईसाठी तयार करण्यात आली होती, तर वाहतूक शाखेकडून १८२२ संशयित वाहनांची तपासणी करून ५६८ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ६३ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.