लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या सुरक्षा ताळेबंदात नागरिकांचा थेट सहभाग ‘माय सेफ्टीपिन’ ॲपद्वारे मिळणार आहे. शहराच्या प्रत्येक भागाचे सुरक्षा गुणांकन कोणत्याही भागातून कधीही प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे, यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ३६५ दिवस, २४ तास सातत्याने शहराच्या सुरक्षेचा ताळेबंद मांडत राहणारी ‘माय सेफ्टीपिन’ ही यंत्रणा पुणे महापालिकेने ‘स्मार्ट सिटीज् मिशन’ अंतर्गत विकसित केली आहे. उपक्रमास २०२० चा ‘स्कॉच रजत पुरस्कार’ही नुकताच मिळाला आहे.
रात्री उशिरापर्यंत काम करणारे, तसेच कामानिमित्त शहराच्या अनोळखी भागांमध्ये प्रवास करणारे नागरिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील कोणताही भाग कितपत सुरक्षित आहे, याची माहिती आता मोबाईल ॲपवर मिळवू शकतात. ‘इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज’ (आययूडीएक्स), बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’(आयआयएससी) आणि ‘माय सेफ्टीपिन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ॲपच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या रस्त्यांची, गल्ली-बोळांची तब्बल ५० हजार छायाचित्रे घेतली. विविध कार्यकर्त्यांच्या साहाय्याने नऊ निकषांच्या आधारे शहरातील ६,५०० हून अधिक ठिकाणांचे सेफ्टी ऑडिट केले. ही सर्व माहिती ॲपद्वारे गुगल मॅप्सशी जोडली.
‘माय सेफ्टीपिन’ ॲप वापरून शहरातील कोणताही नागरिक शहरातील एखाद्या भागाचा सेफ्टी स्कोअर मिळवू शकतो. तसेच संबंधित भागास रेटिंग देऊन सेफ्टी स्कोअर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागीही होऊ शकतो. महिला व ज्येष्ठ नागरिकांना या ॲपचा मोठा उपयोग होत असल्याची माहिती ‘पुणे स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
सेफ्टी ट्रॅकर या फीचरच्या माध्यमातून प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती तिचे ‘रिअल टाईम लोकेशन’ जवळच्या व्यक्तीस पाठवू शकते. प्रवास सुरू असताना एकाच जागी आपण बराच वेळ थांबून राहिलो, तर लगेच त्या व्यक्तीला या संदर्भातील नोटिफिकेशनही जाते. शहरातील सर्वांत सुरक्षित, तसेच असुरक्षित भाग कोणता याचे स्पष्ट प्रतिबिंब या प्रणालीद्वारे दिसून येते. यातून नागरिकांना त्या-त्या भागाचे रिअल टाईम अपडेट्स तर मिळतातच, शिवाय प्रशासनालाही एखाद्या भागाच्या सुरक्षिततेविषयीच्या समस्यांची तातडीने माहिती मिळते. जितक्या लवकर अशी माहिती मिळेल, तितक्या लवकर त्या समस्येवर तोडगा काढणे शक्य होत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीनेही या माहितीस महत्त्व प्राप्त होते. कोरोनामुळे असलेल्या कडक निर्बंधांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी अनावश्यक गर्दी असेल किंवा सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत नसेल, तर त्याचीही माहिती प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला मिळू शकते आणि योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.
--
चौकट
सुरक्षिततेचे नऊ निकष एखाद्या विशिष्ट जागी सुरक्षित किंवा असुरक्षित वाटण्याची नेमकी कारणे कोणती, याचा सखोल अभ्यास करून ‘माय सेफ्टीपिन’मध्ये नऊ निकष तयार केले आहेत. आपण ज्या भागात आहोत, तेथील सुरक्षेचा ताळेबंद (सेफ्टी ऑडिट) खालील नऊ निकषांवर करू शकतो. १. आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसेल इतका प्रकाश आहे का?
२. परिसर मोकळा आहे, की बंदिस्त?
३. इमारती, दुकाने, घरांच्या खिडक्या किंवा बाल्कनींची अंदाजे संख्या-जेथून तुम्ही दिसू शकता.
४. आजूबाजूला कितपत वर्दळ आहे?
५. परिसरामध्ये पोलिस किंवा सुरक्षारक्षकांची उपस्थिती आहे का?
६. व्यवस्थित चालण्यायोग्य रस्ता किंवा पदपथ आहे का?
७. मेट्रो, बस, रिक्षा यांसारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने कितपत जवळ आहेत?
८. आजूबाजूला असलेले महिला आणि लहान मुलांचे प्रमाण.
९. या परिसरात तुम्हाला कितपत सुरक्षित वाटते?
==
कोट
‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने दमदार वाटचाल करीत असलेल्या पुणे शहरासाठी ‘माय सेफ्टीपिन’ या जागतिक पातळीवरील प्रणालीचा वापर सुरू केला आहे. १६ देशांतील ६५ शहरांत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे या प्रकारची सेवा दिली जाते. पुणे शहराच्या सेफ्टी ऑडिटमध्ये प्रशासनासह नागरिकांनाही थेट सहभागी होण्याची संधी देणाऱ्या या भविष्यवेधी प्रकल्पाचा पुणेकरांना नक्कीच फायदा होईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
==
ग्राफिकसाठी...
कसे वापरायचे ‘माय सेफ्टीपिन’ ॲप?
गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘माय सेफ्टीपिन’ हे मोबाईल अॅप डाऊनलोड करा आपले नाव, मोबाईल नंबर आदी माहितीसह रजिस्ट्रेशन करा नोटिफिकेशन व लोकेशन ॲक्सेससाठी परवानगी द्या आपण ज्या भागात आहोत त्या भागाचा सेफ्टी स्कोअर पाहा. त्या भागात तुम्हाला असुरक्षित वाटत असल्यास जवळील पोलिस स्टेशन, रुग्णालय याची माहितीही मिळू शकते. एखाद्या भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठीचा सुरक्षित मार्गही ॲपद्वारे सुचविला जातो. एखादा भाग तुम्हाला कितपत सुरक्षित वाटतो, याचे रेटिंगही देता येते. यात एक म्हणजे सर्वांत असुरक्षित आणि १० म्हणजे सर्वांत सुरक्षित अशी विभागणी केली जाते विविध निकषांनुसार एखादी जागा असुरक्षित म्हणून सतत ‘फ्लॅग’ होत असेल, तर प्रशासन त्यासंदर्भात तातडीने पावले उचलू शकते.