पुणे : शहरातील ३९२ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना आता घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात त्यांना अडचणी येत असल्याने हा उपाय शोधण्यात आला आहे. शहरातील ३९२ झोपडपट्ट्यांमध्ये साडेसात लाख लोक राहतात. यातील जवळपास साडेचार लाख लोकांना ही लस दिली जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे यांनी झोपडपट्टी भागात कोरोना लसीकरणासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर झोपडपट्ट्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने लसीकरण करण्यास प्रशासनाने मान्यता दिली.
पुणे शहरात सुमारे ३९२ झोपडपट्ट्या आहेत. वसाहतींमधील अठरा वर्षांवरील नागरिकांची संख्या साडेचार लाखांहून अधिक आहे. या वस्त्यांमध्ये पालिका लसीकरण केंद्र उपलब्ध करून देणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी न करता ऑफलाइन पद्धतीने लस घेता येणार आहे.
याकरिता सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. पोस्टर्स, बॅनर, लिफलेटस, पत्रक आणि माईकद्वारे जागृती करण्यात येणार आहे. रुग्णालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, शाळा, अंगणवाड्यांमध्ये लवकरच ही केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत.
-----