पिंपरी : श्रमसंस्कृती असणाऱ्या शहरात साहित्य संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडमधील श्रमिकांच्या साहित्यास दिशा मिळेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे संमेलनपूर्व संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित संमेलनात डॉ. मोरे बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, मसापचे शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती सुरू आहे. मॉन्सूनपूर्व मॉन्सून येत असतो, तसे हे संमेलन आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर रुजू झाल्यानंतर मी वर्षभर २९० कार्यक्रम केले. संमेलनाध्यक्ष एक वर्ष स्थापित केलेल्या गणपतीसारखा असतो, अशी टीका काही लोक करतात.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘माणसाने निर्माण केलेले स्वप्न म्हणजे देवत्व होय. संगीत, नाट्य या कलांच्या अभिव्यक्तीचे पूर्णत्व म्हणजे देवत्व होय. भाषांपलीकडे जाऊन विधायक उपक्रम राबविण्याचे काम साहित्य संमेलनाची मंडळी करीत आहेत. त्यात माझा सहभाग आहे, ही आनंददायी बाब आहे.’’वैद्य म्हणाल्या, ‘‘भाषेसाठी होणाऱ्या जगभरातील सोहळ्यांपैकी सर्वांत मोठा सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी माणसांना वाद घालण्याची सवय आहे. चांगले होण्यासाठी वादही आवश्यक असतात. या वेळी ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. गिरीश प्रभुणे, अरुण शेवते, बशीर मुजावर, मधू जोशी, प्रकाश रोकडे, डॉ. वंदना घांगुर्डे, अरुण बोऱ्हाडे, अमृत पऱ्हाड, रमेश डोळस, अशोक त्रिभुवन, अशोक कोठारी, निशिकांत गोडबोले, मकरंद आंबेकर, विष्णू जोशी, सुभाष सरीन, मुरलीधर जावडेकर, चित्रकार मनोहर, शांताराम हिवराळे, संजय पवार यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
श्रमिकांच्या साहित्यास दिशा : मोरे
By admin | Published: December 28, 2015 1:41 AM