लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संचालक मंडळाच्या मासिक बैठकांना सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि संचालक बाळासाहेब नेवाळे यांना उपविधीतील तरतुदीनुसार त्यांचे संचालक पद रद्द करण्याची शिफारस कात्रज संघाने दुग्ध विकास विभागाच्या विभागीय उपनिबंधकांकडे केली आहे. या शिफारशींवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय दिला जाणार आहे.
बाळासाहेब नेवाळे यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील बनावट नावेप्रकरणी अटक केली असून, येरवडा कारागृहात ते सध्या आहेत. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या फेब्रुवारी आणि मार्चमधील मासिक सभेस नेवाळे गैरहजर होते. त्यांनी २८ एप्रिलच्या मासिक सभेपूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे २७ एप्रिल रोजीच्या एका अर्जाद्वारे मंडळाच्या २८ एप्रिलच्या सभेस मी न्यायालयीन कोठडीत असल्याने हजर राहू शकत नसल्याचे कळविले आहे. परंतु नेवाळे यांच्या संघातील यापूर्वीच्या सह्या व अर्जावरील सहीत तफावत आढळली. येरवडा कारागृहात असताना नेवाळे यांच्या अर्जावर येरवडा कारागृह अधीक्षकांची सही व शिक्का नसल्याने संघाने कायदेशीर सल्लाही घेतला.
संचालक मंडळाच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय एखादा संचालक मंडळाच्या लागोपाठ तीन सभांना गैरहजर राहिल्यास त्या संचालकांचे संचालक पद आपोआप रद्द होते अशी तरतूद संघाच्या पोट नियमांमध्ये आहे. त्यानुसार 28 सप्टेंबर रोजीच्या सभेमधील ठरावानुसार नेवाळे यांचे संचालक पद रद्द झाल्याचे संघाने विभागीय उपनिबंधकांकडे शिफारशी द्वारे कळवले आहे.