पुणे : इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने प्रस्तावित केलेली दोन रुपयांची भाडेवाढ संचालक मंडळाने शनिवारी फेटाळून लावली. त्याऐवजी पीएमपी प्रशासनाने उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधण्याचा सल्ला मंडळाच्या बैठकीत देण्यात आला. तसेच पुढील वर्षभरात १५० ई-बससह ८४० सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी झाली. या बैठकीमध्ये भाडेवाढ, बसखरेदीसह विविध मुद्यांवर झालेल्या निर्णयांची माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजी दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन खर्चात लाखो रुपयांची वाढ झाली. परिणामी, तोटा वाढत चालल्याने प्रशासनाने तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय निवडला होता. त्यानुसार प्रति टप्पा दोन रुपये तिकीट दर वाढविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. मात्र, मंडळाने भाडेवाढीला स्पष्टपणे नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.भाडेवाढीबाबत महापौर म्हणाल्या, प्रशासनाने डिझेल व सीएनजी बसचे तिकीट व पास भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. त्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी अन्य उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या प्रवाशांना चांगली सेवा देणे व बस वाढविण्याला प्राधान्य आहे. त्यानंतर उत्पन्न वाढीचा विचार केला जाईल. कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फायद्यासाठी चालविली जात नाही. पण किमान खर्च भागणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाला उत्पन्न वाढीचे पर्यायी मार्ग शोधण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जाईल. दोन्ही महापालिका त्यासाठी सहकार्य करतील. येत्या अर्थसंकल्पामध्ये हे नियोजन दिसेल.----------पीएमपीसाठी ४०० सीएनजी बस विकत घेतल्या जाणार आहेत. त्यातील एका बसची किंमत ४८ लाख ४० हजार ४५५ रुपये एवढी आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने ११७ कोटी व पिंपरी चिंचवड महापालिकेने ७८ अशी एकुण सुमारे १९५ कोटी १९ लाख रुपयांची तरतुद केली आहे. कंपनीकडून आयटीएमएस यंत्रणेची सात वर्षांची वॉरंटी घेतली जाणार आहे, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.------------------
... तर प्रमुख मार्गांवर पाच मिनिटाला बस
संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ४०० सीएनजी बस विकत घेण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. त्याचबरोबर १५० वातानुकूलित ई-बस जीसीसी तत्वावर आणि ४४० सीएनजी बस भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू केली होईल. त्यामुळे पुढील वर्षभरात ताफ्यात सुमारे एक हजार बस दाखल होतील. सध्या भाडेतत्वासह सुमारे २ हजार बस ताफ्यात असून त्यापैकी १४५० बस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. वर्षभरात सुमारे ३०० ते ३५० बस भंगारात काढल्या जातील. त्यामुळे वर्षभरात ताफ्यात एक हजार बसची भर पडेल. त्यानंतर प्रत्येक महत्वाच्या मार्गावर दर पाच मिनिटाला बस सोडणे शक्य होईल, अशी माहिती सिध्दार्थ शिरोळे यांनी दिली.
...........................
अशा येतील बस- ४०० सीएनजी (बिगर वातानुकूलित) : दि. १ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत ५० बस, त्यानंतर प्रत्येक ३० दिवसांनी १०० यापध्दतीने १५ जुलैपर्यंत ४०० बस (१२ मीटर).- १५० ई-बस (वातानुकूलित) : दि. १० जानेवारीपर्यंत २५ बस (९ मीटर), एप्रिल अखेरपर्यंत १२५ बस (१२ मीटर).- ४४० सीएनजी (बिगर वातानुकूलित) : आॅगस्ट-सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व बस.- ३३ तेजस्विनी बस
.......................
डिसेंबर अखेरपर्यंत सर्व.‘चिल्लर’ समस्या सुटणार बँकेने पीएमपीकडे जमा होणारी चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पीएमपीच्या आगारांमध्ये सुमारे ३० लाख रुपयांहून अधिक रक्कम पडून आहे. प्रशासनाकडून कर्मचाºयांनाच नोटांच्या बदल्यात चिल्लर दिली जात आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा करण्यात आली असून चार-पाच दिवसांत ही समस्या सुटेल. त्याचप्रमाणे मी-कार्डची अंमलबजावणी चांगल्यापध्दतीने झाल्यास चिल्लर कमी होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.
..................
पीएमपीसाठी सुसज्ज वर्कशॉप, पार्किंगस्वारगेट येथे उभारण्यात येणाऱ्या ट्रॉन्झिट हब अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पीएमपीसाठी १ लाख चौरस फुट जागेत सुसज्ज वर्कशॉप बांधले जाणार आहे. तसेच कमीत कमी ३०० बसची पार्किंग व्यवस्था असेल. सध्या याठिकाणी केवळ १५० बसचे पार्किंग करता येते. एकुण साडे चार एकर परिसरात हे हब उभे केले जाणार आहे.