पुणे : राज्याच्या विविध भागांतून बदली घेऊन आलेल्या उपशिक्षकांची समुपदेशनाने सेवाज्येष्ठतेनुसार होणारी नियुक्ती यावर्षीपासून थेट होणार आहे. या शिक्षकांना ग्रामविकास विभागाकडील बदली प्रक्रियेतून थेट बदली होणार आहे. या प्रक्रियेतून त्यांना थेट नियुक्तीचे ठिकाण दिले जाणार आहे. ही प्रक्रिया संगणकाद्वारे होणार असल्याने उपशिक्षकांना स्वत:च्या नियुक्तीसाठी पर्याय राहिला नसल्याने मिळेल त्या शाळेत त्यांना सेवा करावी लागणार आहे.जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये विविध जिल्ह्यांतून २१० उपशिक्षक पुणे जिल्ह्यात बदली घेऊन आले आहेत, तर पुणे जिल्ह्यातून ८९ उपशिक्षक अन्य जिल्ह्यांमध्ये बदलून गेले आहेत. यापैकी ७१ उपशिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुक्त केले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या ११ जणांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. शासनाकडून आदेश आल्यावर त्यांना मुक्त करण्यात येणार आहे. ७ पदवीधर दुसºया जिल्ह्यात गेले आहेत.राज्यातील विविध जिल्ह्यांतून बदली होऊन आलेल्या उपशिक्षकांना पूर्वी समुपदेशनाने नियुक्ती दिली जात असे. त्यामुळे उपशिक्षकाला मनासारख्या ठिकाणी जाता येत होते किंवा शाळा निवडीसाठी पर्याय होता. परंतु, यंदा राज्य शासन सूचनानुसार नियुक्ती प्रक्रिया ग्रामविकास विभागाच्या बदली प्रक्रियेतून होणार आहे. त्यामध्ये २१० उपशिक्षकांचा समावेश आहे. या संगणकीय प्रक्रियेमुळे त्यांना शाळानिवडीचा किंवा मनासारखी नियुक्ती मिळवून घेण्याचा पर्याय उरला नाही. त्यामुळे बदलून आलेल्या उपशिक्षकांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.ग्रामविकास विभागाकडील संगणकीय प्रणालीकडे जिल्ह्यात बदलून आलेल्या २१० उपशिक्षकांच्या नावाची यादी पाठविण्यात येणार आहे. संगणकप्रणालीनुसार या उपशिक्षकांना शाळांमध्ये थेट नियुक्तीदिली जाणार आहे. या प्रणालीमध्ये सुगम आणि दुर्गम भागाचा उल्लेख केला आहे.मिळालेल्या ठिकाणी शिक्षकांना जाणे बंधनकारक आहे. शाळा निवडीसाठी त्यांना कोणताही चॉईस राहणार नाही. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
उपशिक्षकांच्या नियुक्त्या होणार थेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:57 AM