पिंपरी : ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या सोमनाथ कोळी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचा पंजा निकामी झाला आहे. सोमनाथला वैद्यकीय उपचारातून पाय बरा नाही झाला, तर पुढे आपल्या मुलाबाळांचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आॅपरेशन करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सोमनाथ अजून खचून गेला आहे.चिंचवड एमआयडीसीमधील सुगरास पशुखाद्य महामंडळात गेल्या महिन्यापासून रंगकाम सुरू होते. एका ठेकेदाराने हे काम घेतले होते. त्या ठेकेदाराकडे ४०० रुपये रोजंदारीवर सोमनाथ २५ दिवसांपासून काम करीत होता. शनिवारी (दि. २०) दुपारी १२.३० च्या सुमारास महामंडळाच्या परिसरातील इमारतींचे रंगकाम सुरू होते. त्या वेळी सोमनाथ इमारतीवरून खाली पडला. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला ठेकेदाराने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. सोमनाथ त्यानंतर घरी गेला. सोमवारी सोमनाथ डी. वाय. पाटील रुग्णालयात गेला. तेथील डॉक्टरांनी ही अपघाताची घटना असल्याने पोलिसांना बालाविले. पोलिसांनी सोमनाथचा जबाब लिहून घेतला आणि शेवटी त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले. डॉक्टरांनी सांगितले की, अंगठ्याच्या मागील हाड तुटून ते इतर बोटांकडे सरकले आहे. त्यामुळे आॅपरेशन करावे लागेल. किमान १२ हजार रुपये खर्च येईल. रोजंदारीवर काम करणारा सोमनाथ इतक्या मोठ्या खर्चाचा आकडा ऐकून घाबरून गेला. ज्या पोलिसांनी जबाब घेतला त्यांना फोन लावला तर ते म्हणाले, ‘‘ठेकेदार येतच नाही. त्याला फोन करून बोलाविले, आम्ही तरी काय करू?’’ सगळीकडून येणाऱ्या नकारांनी सोमनाथचे आणखी खच्चीकरण झाले. फोन करून वैतागलेल्या सोमनाथने गुरुवारी हॉस्पिटलमधील लोकमत पाहिला आणि त्यातील पिंपरी कार्यालयाच्या दूरध्वनीवर फोन केला व मदतीची इच्छा व्यक्त केली.(प्रतिनिधी)
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने कामगाराला आले अपंगत्व
By admin | Published: December 26, 2014 4:54 AM