पुणे : बाळासाहेब ढमढेरे दिव्यांग आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करतात. मला कार्यालयात यायचे आहे, पण येऊ कसे असा त्यांचा प्रश्न आहे.
मी कधी रजा काढत नाही, कोरोना काळातही माझी नियमित उपस्थिती आहे. माझ्यासारखेच अनेक दिव्यांग वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये काम करतात, त्यांचा काहीही विचार न करता पीएमपी बंदचा निर्णय घेतला गेला असा संताप त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
ढमढेरे शिक्रापूरला राहतात. ते वकिल आहेत. पीएमपीत बसून मी अगदी व्यवस्थित, सुरक्षीत व स्वस्तातही रोज महापालिकेत येत होतो व काम करत होतो. सरकारच्या या निर्णयाने आम्हा दिव्यांगाची अडचण केली असे ते म्हणाले.
दिव्यांगासाठी रिक्षा हा पर्याय नाही. आता तर पीएमपी बंद असल्याने रिक्षा व्यावसायिकांनी दर वाढवलेत. शिवाय एका रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त जण बसवतात. यातून कोरोनाची संसर्गाची साखळी तुटणार आहे का, असा प्रश्न ढमढेरे यांनी केला.
कोरोना उपाययोजना करताना सरकार दिव्यांगांचा, त्यांना येणाऱ्या अडचणींचा थोडाही विचार करायला तयार नाही. त्यांंना हा विचार करायला लावावा, यासाठी वेळप्रसंगी न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याची ढमढेरे यांनी सांगितले.