नम्रता फडणीस- पुणे : वय अवघे २२ वर्षांचे. आई धुणीभांडी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करते, तर ‘ती’ सरबताची गाडी चालविते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तरीही स्वत:ची दु:ख उगाळत बसण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यासाठी ‘ती’ने पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवित त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ती’ धडपडत आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोबाईलमध्ये हरवलेल्या तरुणाईपुढे आपल्या विधायक कार्यातून ‘ती’ने आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांना भिडणाऱ्या या रणरागिणीचे नाव आहे सुप्रिया कापा लोखंडे. वाघोली येथील सरकारी गायरान जागेत ती राहते. वडिलांच्या आजारपणामुळे घराची सर्व जबाबदारी आई आणि सुप्रिया दोघींनी आपल्या खांद्यावर पेलली आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने सुप्रियाला शिक्षण पूर्ण करता आले नाही. जेमतेम चौथीपर्यंतच शिक्षण ती घेऊ शकली. २०१२ मध्ये प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वयाच्या सोळाव्या वर्षी तिने आमदार बच्चू कडू यांचे विचार ऐकले आणि ती प्रभावित झाली. त्या दिवसापासूनच समाजातील दुर्लक्षित वंचित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी तिने लढण्याचे ठरविले. अगदी दिव्यांगांना व्हीलचेअर मिळवून देणे, त्यांना जिल्हा परिषदेकडून महिना १ हजार रुपये निर्वाह भत्ता मिळवून देणे, अपघातामध्ये दोन पाय गमावलेल्या युवकाला रुग्णालयात तातडीची मदत मिळवून देत दोन महिन्यात जयपूर फूटच्या साहाय्याने स्वत:च्या पायावर उभे करणे, दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रॅलीचे आयोजन आदी विविध कार्यांमध्ये ‘ती’ने पुढाकार घेतला आहे. सुप्रिया म्हणाली, की गेल्या सात वर्षांपासून मी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहे. शेतकरी बांधवांच्या गुजरात, मुंबई आंदोलनातही सक्रिय सहभागी झाले होते. पोलिसांचा लाठीमारदेखील खाल्ला आहे. जी गतिमंद मुले आहेत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील मानधन मिळायला पाहिजे. ...मी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा रहिवासी आहे. टाकी पाडण्याचे काम करीत असताना दोन्ही पायांवर काही भाग कोसळला. सोलापूर मध्ये कुठलेच डॉक्टर हात लावत नव्हते. तेव्हा सुप्रियातार्इंना फोन केला. पुण्यात ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोन्ही पाय कापावे लागले. त्यांनीच कृत्रिम पाय मिळवून दिल्याने आज स्वत:च्या पायावर उभा आहे.- रामा वाघमोडे, दिव्यांग................सुप्रियाताईंनी व्हीलचेअर मिळवून देण्यापासून ते निर्वाह भत्ता मिळवून देण्यापर्यंत सर्व मदत केली. त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. - शबाना सय्यद, दिव्यांग
दिव्यांग दिन विशेष : अपंगांच्या प्रश्नांना भिडणारी ‘रणरागिणी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 3:53 PM
स्वत:ची दु:ख उगाळत बसण्यापेक्षा इतरांचे अश्रू पुसण्यासाठी ‘ती’ने पुढाकार घेतला आहे....
ठळक मुद्देवडिलांच्या आजारपणामुळे घराची सर्व जबाबदारी आई आणि सुप्रिया दोघींनी आपल्या खांद्यावर