लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त असतानाही लसवाटपात गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागावर अन्याय होत आहे. लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे क्षमता असतानाही लसीकरणाचा वेग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला वाढवता येत नसून यामुळे लसीकरणाचा वेग संथ गतीने सुरू आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी कोटा वाढवून देण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र, अजूनही लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा हा कमी होत आहे. यामुळे जवळपास १९ लाख नागरिक हे पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागाला समप्रमाणात लस वाटपाचे धोरण शासनाचे आहे. मात्र, असे असतांना लस वाटपात ग्रामीण भागासोबत दुजाभाव होत आहे. लस कमी उपलब्ध होत असल्याने अजूनही १९ लाख नागरिक पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यातील ६ लाख ८७ हजार ३१८ जणांना दुसरा डोस मिळाला आहे. जिल्ह्यात अपेक्षित लाभार्थी ३६ लाख २ हजार ६२४ आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहारांचा विचार केल्यास ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त आहे. असे असतांनाही त्या तुलनेत लसींचे डोस कमी मिळत असून समप्रमाणाच्या वाटपाच्या धोरणालाही तिलांजली देण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका व ग्रामीण भागात एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यात पुणे महापालिका क्षेत्रात ३० लाख ९२७ लाभार्थी आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १९ लाख ३६ हजार १५४ लाभार्थी आहेत. ग्रामीण भागात ३६ लाख दोन हजार ६२४ नागरिक आहेत. यातील एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी १६ लाख ९६ हजार ४३९ जणांना लसीचा पहिला डोस मिळाला. ६ लाख ९ हजार ७० हजार ५९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पुणे शहरात २१ लाख ६९ हजार ६८४ नागरिकांनी पहिला डोस घेतला. जवळपास ७२ टक्के नागरिकांचे लसीचा एक डोस पुण्यात घेतला आहे. तर ६ लाख ७५ हजार १५७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहारात ८ लाख ७५ हजार ८९८ जणांना पहिला डोस मिळाला. यातील २ लाख ९२ हजार ४४६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
चौकट
ग्रामीण भागाचा बाधित दर येईना कमी
जिल्ह्यात जवळपास १०७ गावे हॉटस्पॉट आहेत. या गावात रूग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक मोहीम सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. असे असले तरी जवळपास ५.५ टक्के बाधित दर ग्रामीण भागाचा आहे. धडक सर्वेक्षणात करण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांचा दरही ६.६ टक्के एवढा आहे. हा दर कमी आणायचा असेल तर लसीकरण वेगाने हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे.
चौकट
एका दिवसात एक लाख लसीकरणाची क्षमता
जिल्ह्यात जवळपास ४०७ लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरणात रोज १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. जुलै महिन्यात एका दिवसात लाखाच्या आसपास नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने क्षमता असूनही लसीकरण जिल्हा आरोग्य विभागाला करता येत नाही.
कोट
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या ४०७ लसीकरण केंद्रांवर दररोज एक लाख लसीकरणाची क्षमता आहे. शासनाकडूनच मुळात लसींचा पुरवठा कमी होतो. आम्ही मागणी जास्त लसींची मागणी केली आहे. जो साठा जिल्ह्याला मिळतो त्यांचे योग्य वितरण केले जाते. ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.
कोट
अतिरिक्त लसपुरवठ्याची पालकमंत्र्यांकडे केली मागणी
रविवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे ग्रामीण भागाला जास्त लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सिरमचे प्रमुख आदर पुनावाला हे पुण्यात आल्यावर त्यांना जिल्ह्यासाठी अतिरिक्त लस पुरवण्यात यावी यासाठी लसींचे अतिरिक्त उत्पादन करण्याचे मागणी करणार असल्याचे सांगितले.
- निर्मला पानसरे, अध्यक्षा, पुणे जिल्हा परिषद