पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रुग्णसंख्या वाढू लागल्याने संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ या पदाची ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी काही विद्यार्थी करू लागले आहेत. मात्र परीक्षा नियोजित वेळीच घ्यावी, यावरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
परीक्षा नियोजित वेळीच झाली पाहिजे असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर सध्या कोरोनाने राज्यभर थैमान घातले आहे. यावरून परिस्थिती भयाण आहे. तसेच पेठेतील २० टक्के विद्यार्थ्यांना कोरोनासदृश लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, परीक्षा देता यावी म्हणून विद्यार्थी अंगावर दुखणे काढत आहेत. उपचार घेण्यास वेळ लावल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून शहरातदेखील एखाद्या व्यक्तीने उपचार घेण्यास वेळ लावल्याने मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच एकदाची परीक्षा होऊन जाऊ द्या, असे मत असलेल्यांचा एक गट आहे. त्यामुळे परीक्षा झाली पाहिजे की नाही यावरून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
एमपीएससीची परीक्षा घेण्याची तयारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेऊन सिद्ध केले आहे. तसेच सरकारच्या झालेल्या बैठकीत परीक्षा घेण्याबाबत सकारत्मकता देखील दाखवण्यात आली आहे. तसेच वाहतुकीस देखील अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रवास, रिक्षा वाहतूक, खुली ठेवली जाणार आहे.
परीक्षेपेक्षा जीव महत्त्वाचा
परीक्षा पुन्हा कधीही देता येईल. एकदा जीव गेला की परीक्षेचा काय उपयोग होणार आहे. आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न कधीही पूर्ण करता येईल. मात्र, जीव गेलेला कसा आणून देणार आहे. एकवेळ रिकाम्या हाताने घरी गेले तरी चालेल, पण कोणा विद्यार्थ्याचे पार्थिव त्या निष्पाप आई-वडिलांच्या पदरी नको. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी भावनिक साद सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना घातली जात आहे.
विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- आता परीक्षा पुढे गेली तर पुन्हा कधी परीक्षा घेतली जाणार
- पूर्व परीक्षा होऊ द्यावी, मुख्य परीक्षा लांबली तरी चालणार
- वय वाढत असून आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
- पूर्व परीक्षेचा ताण वाढत जाणार