सासवड : सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे. त्याचा परिणाम किती होईल, हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
सासवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा मोहम्मद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रचारप्रमुख सुदाम इंगळे, विजय कोलते आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. माझ्याकडे आकडेवारी असून, दोन वर्षांत ६७ हजार महिलांवर अत्याचार झाला. ही लहान गोष्ट नाही. बेपत्ता होण्याचीही माहिती असून, राज्यात ६४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे, त्या नागपुरातील ही नोंद आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शैक्षणिक संस्था वाढल्या; पण संधी कुठे आहे, नोकरी नाही, रोजगार नाही, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न मांडणे आमचे काम आहे.
काही जण पाच वर्षे मुंबईत राहतात, निवडणुका आल्या की गावाला येतात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, असे सांगून लोकांना भुलवायचे. मुख्यमंत्रीही येतात आणि कौतुक करतात आणि निघून जातात. याला काय अर्थ आहे. गुंजवणी प्रकल्प आम्ही मंजूर केला. ९५ टक्के काम ही पूर्ण केले. पुढे ते दहा वर्षे सत्तेत होते. त्या विभागाचे मंत्री होते. मात्र, अजूनही पाणी आले नाही. पुरंदरच्या इतर योजना पुरंदर उपसा जलसिंचन, जानाई शिरसाई योजना, उद्योगवाढीसाठी यांचे योगदान काय? अशी टीका विजय शिवतारे यांचे नाव न घेता पवार यांनी केली.