पुणे : शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा राज्याच्या अंदाजपत्रकात उल्लेख झाला. मात्र निधीबाबत एकही शब्द त्यात नाही. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याशी चांगलेच परिचित असल्याने त्यांच्याकडून काही निधीची तरतूद होईल, अशा अपेक्षेत असलेल्या पुणेकरांची त्यासंदर्भात निराशा झाली आहे.
स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी असे मेट्रोचे दोन विस्तारित मार्ग सध्या आहेत. आता सुरू असलेल्या पिंपरी ते स्वारगेट अशा मार्गाचाच हा दोन्ही बाजूंचा विस्तार आहे. सध्याचे काम सुरू झाल्यानंतर लगेचच त्याची मागणी सुरू झाली. दोन्ही महापालिकांनीही त्याला मंजुरी दिली. त्यामुळे महामेट्रोने त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला. तो आता महापालिकेकडून राज्य सरकारकडे व राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी म्हणून गेला असून त्यालाही आता काही महिने होऊन गेले आहेत.
या कामासाठी केंद्र सरकारने १० टक्के निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. यातील पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचा एकूण खर्च ९४६ कोटी ७३ लाख इतका आहे. त्याशिवाय स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारी असून त्याचाही खर्च असाच काही कोटी रूपये आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पांचा फडणवीस यांनी त्यांच्या अंदाजपत्रकीय भाषणात उल्लेख केला; मात्र त्यासाठी किंवा सध्या सुरू असलेल्या कामासाठीही निधीची काहीच तरतूद अंदाजपत्रकात केलेली नाही.