लोणावळा : लोणावळा शहर व धरण परिसरात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरूअसल्याने परिसरातील सर्व धरणे भरली असून, डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. परिसरात झालेल्या पावसाने भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाकडे, तसेच लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गुडघाभर पाणी होते. अनेक दुकांनामध्ये पाणी घुसले होते. लायन्स पॉइंट व भुशी धरणाचा परिसर डोंगरमय असल्याने लोणावळा शहरापेक्षा त्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धुके असल्याने समोरचा मार्गही नीट दिसत नाही. त्यातच भुशी गावाला जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने धोकादायक म्हणून जाहीर केल्याने या भागात काही दुर्घटना घडू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळे दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पर्यटनस्थळे अजून काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाळी पर्यटनासाठी घाटमाथ्यावरील पर्यटकांची पंढरी म्हणून ओळख असणारे व मध्य रेल्वेच्या मालकीचे असलेले भुशी धरण हे ब्रिटिश काळात १९०६ साली बांधण्यात आले आहे. ते तब्बल ११० वर्षांचे झाले असल्याने महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बंद ठेवण्यात आले. धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांसाठी ते धोकादायक आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर भिंतीवरून पाणी वाहून रस्त्यावर येत असल्याने, तसेच सहारा पूल ते आयएनएस शिवाजी गेटदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने ही पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. याकरिता कुमार चौक, रायवूड उद्यान व सहारा पूल येथे पोलिसांनी बंदोबस्त तैनात करत पर्यटकांना पर्यटनस्थळांकडे जाण्यास मज्जाव करत माघारी पाठविल्याने पर्यटकांचीदेखील निराशा झाली. मात्र, हे सर्व तुमच्या सुरक्षिततेकरिताच केले असल्याचे पोलीस कर्मचारी पर्यटकांना समजावत होते. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकदेखील सहारा पूल येथे तैनात करण्यात आले होते. या पथकातील राधिका हे श्वानदेखील या वेळी वाहनांची तपासणी करताना पथकाच्या सोबत होते.पर्यटनस्थळे बंद ठेवल्याने ऐन सिझनमध्ये तेथील विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. बंदीमुळे आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने पर्यटकही फिरकले नाहीत. (वार्ताहर)
भुशी धरण बंदमुळे पर्यटकांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2016 4:11 AM