नीरा : मागील आठवडेभरात पावसाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, वेल्हा, तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगर रांगांमध्ये दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरण साखळीत पाणीपातळी वाढली. नीरा खोऱ्यातील ओढे-नाले भरून वाहू लागले. आता गुंजवणी, भाटघर, नीरा-देवधर ही तीनही धरणे सोमवारी १०० टक्के भरली, त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. परिणामी, वीर धरण आज सोमवारी दुपारी १०० टक्के भरले. सायंकाळी ६ वाजता २३ हजार १८५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
सोमवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी वीर धरण ९५.६८ टक्के, तर दुपारच्या चार वाजत १०० टक्के भरले, त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून दुपारी २:०० वाजता ४ हजार ६३७ क्युसेक्ने, चार वाजता विसर्ग वाढवून ९ हजार २७४ क्युसेकने, सायंकाळी पाच वाजता १३ हजार ९११ क्युसेक, तर सायंकाळी सहा वाजता २३ हजार १८५ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून काठावरील लोकांना सतर्कतेचा इशार नीरा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.