पुणे : गायन,वादन आणि नृत्य यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते. संगीताच्या एखाद्या कलेत पारंगत होण्यात मानवी जन्माची सार्थकता आहे. आजच्या पिढीकडे प्रसिध्दीच्या झोतात राहण्यापेक्षा कलेच्या साधनेत स्वत:ला कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.त्यासाठी कलेच्या प्रांतात असा गुरु लाभणे भाग्याचे लक्षण आहे. संगीताच्या साधनेसाठी रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन यांनी केले. पंडित विनायक फाटक यांच्या ७१व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ व संगीत मैफलीचे जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल येथे आयोजित करण्यात आली होती. हुसेन म्हणाले की, पंडित विनायक फाटक यांच्यासारख्या ज्येष्ठ गुरुने शेकडो शिष्य तयार केले आहे. ही मोठी संगीत सेवाच आहे गायन, वादन आणि नृत्य यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी संगीत शिकायला सुरुवात केल्यापासून ४० दिवस घराच्या बाहेर न पडता सतत रियाझ करून कला वृध्दिंगत केली पाहिजे.यावेळी त्यांनी कलासागरतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय राज्यनाट्य संमेलनात‘कलारत्न’ २०१८ हा पुरस्कार पंडित विनायक फाटक यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा या मैफलीत करण्यात आली. या सोहळ्या निमित्त आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत फाटक यांच्या कन्या आणि गायिका डॉ. रेवा नातू यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. त्यांनी प्रथम राग यमन मधील देहो दान मोहे या विलंबित झुमरा या बड्याख्यालाने मैफलीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नातू यांनी ननदिके बचनवा सहेन जाये,उदानी दानी तदानी हा द्रुत त्रितालात तराना अत्यंत कसदारपणे सादर करून सर्वांना जागीच खिळवून ठेवले. त्यानंतर पंडित बलवंतराय भट्ट यांनी राग अडाणा मध्ये होरी होरी खेलत नंदलाल हा चतरंग सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रेवा नातू यांना लीलाधर चक्रदेव ( संवादिनी),साथ विवेक भालेराव (तबला) व प्रणाली पवार ( तानपुरा) यांची सुरेख साथसंगत लाभली.त्यानंतर ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायक फाटक यांचे स्वतंत्र तबलावादन सादर झाले.यामध्ये प्रथम पेशकार, कायदे, मुखडे तुकडे, रेला, परण आणि विविध पारंपारिक उस्तादांच्या रचनांचा समावेश स्वतंत्र तबलावादनामध्ये करण्यात आला. ध्वनी व्यवस्था रवी मेघावत यांची लाभली होती व सूत्रसंचालन पराग आगटे यांनी केले..