पुणे : राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात असाक्षरांचे वर्ग तत्काळ सुरू करावेत. त्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे. दुर्लक्ष करणारे शिक्षक व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नियामक परिषद रचना समितीच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी जि.प. शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव कमलाकांत म्हेत्रे, जिल्हा समन्वयक नामदेव गवळी, शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख वि. ग. तांबे, शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता एन.पी. शेंडकर आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमात प्राधान्याने लक्ष घालून राज्यात जिल्ह्याची कामगिरी चांगली होईल, यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षक संघटनांनी या कार्यक्रमावरील टाकलेला बहिष्कार तत्काळ मागे घेऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच जिल्ह्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात केवळ ५२५ व्यक्ती साक्षर
पुणे जिल्ह्यात १५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निरक्षर व्यक्तींची संख्या निरक्षर व्यक्तींची संख्या १० लाख ६७ हजार ८२३ एवढी आहे. त्यापैकी २०२२-२३ या दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६३ हजार ९५० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या ‘उल्लास’ ॲपमध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उल्लास ॲपवर ५२५ व्यक्तींना साक्षर केल्याची नोंद झाली आहे.