बारामती : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील सर्व ८० संघटनांनी एकजुटीने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. शाळा बंद करून आझाद मैदान येथे सर्व संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारीला काढण्यात येणाºया इशारा मोर्चाच्या वेळी राज्यव्यापी आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार आहे. माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.पुणे येथे नुकतीच सर्व शिक्षक आमदार व शिक्षण विभागातील ८० संघटनांची एकत्रित बैठक राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात झाली. प्राथमिक शिक्षकांची राज्यभर तब्बल २५,००० पदे रिक्त आहेत. शासनाने वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. खासगी कंपन्यांना शाळा चालविण्यास परवानगीचे धोरण गोरगरीब मुलांच्या मुळावर येणार आहे. त्यामुळे खासगीकरणास विरोधाचा ठराव करण्याचे सर्व संघटनांनी ठरविले आहे. मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदल्यांबाबत वादग्रस्त धोरण राबविण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. सर्वसमावेशक बदली धोरण तयार करून प्रशासकीय बदल्या तालुक्यांतर्गत व्हाव्यात. अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या विनंती बदल्या विनाअट कराव्यात, यासाठी समानिकरणाची अट शिथील करण्याची शिक्षकांची मागणी आहे.वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुधारित आदेश रद्द करावा, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व विनाअनुदानीत शाळांना अनुदान द्यावे, यासह माध्यमिक व महाविद्यालयीन विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी अंगणवाडी ते महाविद्यालयापर्यंत सर्व शिक्षण क्षेत्र एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात हे आंदोलन होणार आहे, अशीमाहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.>राज्यभर आंदोलनराज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यापूर्वी शासनास जागे करण्यासाठी पुणे येथील राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर १२ फेब्रुवारी रोजी सर्व संघटनांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात इशारा मोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या इशारा मोर्चाच्या वेळी राज्यव्यापी आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.केजी टू पीजी आंदोलनशिक्षणक्षेत्रातील अस्वस्थता सरकारला समजत नाही. त्यामुळे बालवाडीपासून प्राध्यापकांपर्यंत म्हणजेचकेजी टू पीजी हे सारे शिक्षणक्षेत्र आंदोलनात उतरणार आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी सांगितले.
शिक्षकांमध्ये असंतोष, ८० संघटनांचा सरकारविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:20 AM