पुणे : सध्या रक्तपेढीमध्ये प्लाझ्माची एक बॅग खरेदी करण्यासाठी ६००० रुपये मोजावे लागतात. अँप्रोच हेल्पिंग हँड फाउंडेशन, द सावली फाउंडेशन आणि जनकल्याण रक्तपेढीतर्फे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी प्लाझ्मा बॅग २५०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
गरजू आणि गरीब रुग्णांना आवश्यक कागदपत्रांसह सावली फाउंडेशनच्या शनिवार पेठेतील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. तेथून त्यांना टोकन दिले जाईल आणि ते टोकन दाखवून जनकल्याण रक्तपेढीतून प्लाझ्मा बॅग घेता येणार आहे. यामध्ये त्यांना २५०० रुपये भरायचे आहेत, उर्वरित २५०० रुपये निधीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर, रक्तपेढीतर्फे १००० रुपयांची सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती सावली फाउंडेशनच्या सायली धनाबाई यांनी दिली.