पौड : पानशेत - कासार आंबोली येथून बुधवारी (दि. २४) राहुल काशिनाथ इंगवले (वय ३२, रा. पिरंगुट, ता. मुळशी) याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी त्याचे शरीर जाळले होते. याचा उलगडा शनिवारी झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत केवळ १२ तासांत आरोपींचा छडा लावला आहे. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे.
आकाश केदारी, शेखर केदारी, विक्रम जगताप (तिघे रा. पिरंगुट ता. मुळशी), प्रमोद कांबळे (रा. कासार आंबोली) अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांनी राहुलना जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केल्याची तक्रार गीता इंगवले यांनी दिली होती. या तक्रारीवरून पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला. आरोपी पिरंगुट येथे सापडले त्यांना ताब्यात घेण्यात आले गुन्हाचा तपास करीत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राहुल इंगवले यांच्या पिरंगुट येथून अपहरण करून त्याला कासार आंबोली येथील म्हसोबा टेकडी येथील खाणीत नेऊन खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे शरीर आरोपींनी जाळले.