पुणे : मॉन्सूनचे आगमन आणखी लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता असल्याने महापौर प्रशांत जगताप मंगळवारी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मॉन्सूनची काय परिस्थिती असणार आहे, याची माहिती ते जाणून घेणार आहेत. त्यानंतर महापौर पाटबंधारे विभाग व महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. देशातील हवामानाचा अंदाज वर्तविणारे हवामान विभागाचे महत्त्वाचे कार्यालय शिवाजीनगर येथे आहे. सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचा पाऊस नेमका कधी येऊ शकेल, त्याचबरोबर किती पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची सखोल माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. त्या आधारावर शहराच्या पाण्याचे नियोजन ठरविले जाणार आहे.प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘पाऊस लांबल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे़. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पाटबंधारे विभाग व पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी सकाळी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाचा अंदाज घेतला जाणार आहे.’’ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २.१५ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यातील राखीव पाणीसाठा वगळल्यास साधारणत: सव्वा ते दीड महिना इतकेच दिवस हे पाणी शहराला पुरवता येऊ शकणार आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सून आणखी लांबल्यास काय करायचे यावर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचा पाऊस नेमका कधी येऊ शकेल, त्याचबरोबर किती पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची सखोल माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे.
पाणीप्रश्न टाळण्यासाठी हवामान खात्यासोबत चर्चा
By admin | Published: June 14, 2016 4:48 AM