लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर १६ जूनपासून सभागृहात चर्चा सुरू होईल. नगरसेवकांनी त्याचा अभ्यास सुरू केला असून, विरोधकांसह बहुतेकांचा सूर अंदाजपत्रकाबाबत निराशेचाच असल्याचे दिसते आहे. प्रामुख्याने काही विभागांच्या वसुलीवर दिलेला भर चर्चेचा विषय होण्याची दाट शक्यता आहे.बांधकाम विभाग, तसेच मिळकत कर विभाग यांच्याकडून अवास्तव उत्पन्न अपेक्षित धरले असल्याचे बहुतेक जुन्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बांधकाम विभागाला मागील वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे. त्यांच्याकडून फक्त ५५० कोटी रूपये जमा झाले होते. असे असताना त्यांच्याकडून यावर्षात चांगले म्हणजे तब्बल १ हजार १६५ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. मिळकत कर विभागालाही १ हजार ५७६ कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.वसूल होऊच शकणार नाही, अशा रकमा जमेस धरून त्यावर आधारित अवाजवी खर्च गृहीत धरणे चुकीचे आहे, त्यामुळे अंदाजपत्रक कोसळते व कोणतीच कामे मग अखेरच्या कालखंडात होत नाहीत, असे मत काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले.महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर होणार यात शंका नाही, मात्र त्यावर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवून देण्याची संधी सोडायची नाही, असा निर्धार विरोधकांनी केला आहे. त्यातही विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आदींकडून अंदाजपत्रकावर तोफ डागली जाण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही त्याचा जोरदार प्रतिवाद करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह थझनेते श्रीनाथ भिमाले सदस्यांची तयारी करून घेत आहेत.
अंदाजपत्रकावरची चर्चा १६ जूनला
By admin | Published: May 13, 2017 4:55 AM