हनुमंत देवकर चाकण : येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हजारो हेक्टर जागा संपादित करून तेथे मोठमोठे उद्योगव्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे अनेक नोकरदार वर्ग या परिसरात स्थलांतरित होवून नोकरीच्या निमित्ताने या परिसरात राहत आहेत. औद्योगिक वसाहतीच्या परिसरात कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले आरोग्य केंद्र, वाहतूक व्यवस्था, महिलांसाठी कम्युनिटी हॉल, करमणूक केंद्र, सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन, महिलांसाठी वसतिगृह त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण इ. महत्वाच्या सोयीसुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करण्याचे आवश्यक असताना अशा सुविधा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करूनही निर्माण न करण्यात आल्याने कामगारांची सुरक्षा त्याचबरोबर त्यांचे आरोग्य व कौटुंबिक जीवन धोकादायक होत आहे. तसेच औद्योगिक परिसरात कारखान्यांना आग लागण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत असून सद्य स्थितीत असणारी अग्निशमन यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उक्त सोयीसुविधा तत्काळ निर्माण करण्याची तसेच सध्या करीत असलेली कार्यवाहीची माहिती प्राप्त करणे आवश्यक वाटल्याने आमदार सुरेश गोरे यांनी या विषयावर सभागृहात अर्धा तास चर्चा उपस्थित केली.या चर्चेला उद्योग मंत्री अनुपस्थित असल्याने संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी उत्तर दिले. उत्तरात त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आमदार सुरेश गोरे यांच्या मनात असलेले प्रेम या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून निदर्शनास आल्याचे सांगितले. तसेच अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा उपस्थित केल्यामुळे आमदार गोरे यांचे अभिनंदन केले. सरकार आणि पालकमंत्री या नात्याने जबाबदार म्हणून मी स्वतः कामगार आयुक्त, कामगार मंत्री तसेच एमआयडीसी यांच्या सोबत बैठक घेवून यावर सविस्तर चर्चा करून डीपीडीसी, सीएसआर तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. वाढत्या आगीच्या घटना पाहता पीएमआरडीए मार्फत अग्निशामक केंद्र ही उभे केले जाणार आहे.आमदार गोरे यांनी यावेळी म्हाळुंगे इंगळे गावासाठी शासनाकडून मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची आवश्यकता असून जागेअभावी आरोग्य केंद्र होवू शकत नाही. त्यासाठी जागेची मागणी करण्याच्या प्रस्ताव एमआयडीसी कडे दिला आहे त्यास मंजुरी मिळावी अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री बापट यांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव तपासून किती जागेची आवश्यकता आहे आणि किती जागा देणे शक्य आहे हे तपासून याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे आता म्हाळुंगे गावासाठी मंजूर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधे कामगारांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबत अधिवेशनात अर्धा तास चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 8:37 PM