पिंपरी : सांगली, कोल्हापूर मधील पाणी हे अजूनही राजापूरपर्यंतच पोहचलं आहे. एकंदर परिस्थिती पाहता हे पाणी पुढे अलमट्टी धरणात साठलं जात असते. त्या धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे, सूचना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पिंपरी चिंचवडमध्ये कष्टकरी कामगार मेळाव्यास आले होते. त्यानंतर जयंत पाटल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘सांगली पूर परिस्थितीवर आम्ही पूर्णत: लक्ष देत असून सुमारे १२०० कुटुंबाना स्थलांतरित करण्याचं काम करत आहोत. स्वत: मुख्यमंत्रीही प्रत्येक पूरस्थितीची माहिती घेत आहेत. वेळ पडल्यास ते पूरग्रस्त भागाचा दौराही करणार आहेत.
ज्या भागांमध्ये पूर आला आहे. त्या भागात मदतीची यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच एनडीआरएफची मदत पथकंही सज्ज आहे. कोणत्या भागात पाणी शिरेल, याचा अंदाज घेऊन त्या भागात अगोदरच मदत कार्य सुरू केलं आहे. कृष्णा नदीला पूर आलेला आहे. सकाळपासून पावसाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पुराचे पाणी काही प्रमाणात कमी झालं आहे. जर अतिरिक्त पाऊस आणि जोर वाढल्यास नदीकाठच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्या त्या भागातील प्रशासन सज्ज ठेवले आहे. कोणत्याही भागात दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.’’
कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊसकोयना धरणात २४ तासांत १२ टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थपित झाला असून मागील ४८ तासांमध्ये १८ टीएमसी पाणी जमा झाले आहे. ७० टक्के धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे आणि त्याचप्रमाणे पाणी सोडले जात आहे. याचवेळी बचावकार्य सुरळीत सुरू आहे.
महाबळेश्वरमध्ये ४८ तासांत १०७४.४ मिलीमीटर पाऊस गेल्या ४८ तासात १ हजार ७४ .४ मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये १४२ मिमी पाऊस पडला आहे.
सांगलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हा मार्गांचा समावेश आहे.