पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील काही मुस्लीम मतदारांनी ते भयग्रस्त झाले असल्याचेही आपणाला सांगितले. एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला, असेही मोरे यांनी जाहीर केले.
राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र पुण्यातील मनसेतील मोठं नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान आता वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा रंगली आहे. ''किसीं की क्या मजाल जो छेडे दिलेर को...गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को...'', अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे. उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे- वसंत मोरे
मी शहराध्यक्ष असलो तरी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या प्रभागातील मुस्लिम मतदार नाराज होत असतील, भयग्रस्त होत असतील तर मला त्याची काळजी करायलाच हवी. राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे, प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन यावर बोलेन असेही मोरे म्हणाले होते.
मोरे यांचे समाधान होईल- मनसे नेते राजेंद्र वागसकर
राज ठाकरे यांच्या भाषणामुळे अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडणे, त्यांनी टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी सांगितले. ९ मार्चला ठाण्यात आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल, असे ते म्हणाले.