चर्चा तर होणारच... भाजपा नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजींनी घेतली अजित पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:43 PM2021-01-13T23:43:43+5:302021-01-13T23:44:12+5:30
बापूराव कर्णे गुरुजी सर्वप्रथम अपक्ष व त्यानंतर काँग्रेस कडून निवडून आले. तिसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या गुरुजींना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून महापालिकेची "तिजोरी" सांभाळण्याची देखील संधी मिळाली होती.
येरवडा- प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलून निवडून येणारे येरवडा येथील भाजपाचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. गांधीनगर प्रभागातील गवनि घोषित झोपडपट्टीच्या जागी वाल्मीकि आंबेडकर व बीएसयूपी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना शासनाकडून लाभार्थ्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. प्रत्येक निवडणुकीला "सातबाराचे आश्वासन" देणाऱ्या राजकारणातील अनुभवी गुरुजींनी घेतलेली अजित पवार यांची "हि" भेट म्हणजेच "ते"पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
बापूराव कर्णे गुरुजी सर्वप्रथम अपक्ष व त्यानंतर काँग्रेस कडून निवडून आले. तिसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या गुरुजींना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून महापालिकेची "तिजोरी" सांभाळण्याची देखील संधी मिळाली होती. मागील निवडणुकीत अनेक पक्षातील नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत गुरुजींनी देखील भाजपकडून उमेदवारी घेऊन यंदा निवडून आले. चौथ्यांदा निवडून येऊन देखील प्रभागातील नागरीकांचा "सातबारा" अद्यापही "कोरा" आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शासनाकडील महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्यासाठी वडगाव शेरी चे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या मदतीने गुरुजींनी पुन्हा एकदा अजित दादांकडे "साकडे" घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गुरुजी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून गुरुजींनी सातबारा नावे करून दिल्यानंतर गुरुजींचा देखील आगामी प्रवास राष्ट्रवादीच्या वाटेवर सुखकर होण्याची चिन्हे आहेत.