पिंपरी : रेड झोन प्रश्न, पवना बंदिस्त जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प, संरक्षण खात्याच्या हद्दीतील बोपखेल आणि पिंपळे सौदागर रस्ता, याशिवाय बीआरटी आणि पवनासुधार प्रकल्प या विविध विषयांवर पुण्यात आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत शुक्रवारी चर्चा होणार आहे. पुण्यातील विधानभवनात पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व आमदार, पालिकेतील विविध पक्षांचे गटनेते, अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.भोसरी आणि तळवडे येथे रेड झोन हद्दीतील घरांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने रेड झोनची हद्द कमी करावी. महापालिकेचा ४०० कोटींचा बंदिस्त जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प शासनाने स्थगिती उठविल्यास मार्गी लागेल. नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावचा विकास आराखडा मंजूर व्हावा, पवना नदीविकास प्रकल्पासाठी शासनाने अनुदान मंजूर करावे, बीआरटी प्रकल्प मार्गी लागावा आदी मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसोबत शहराच्या प्रश्नांवर होणार चर्चा
By admin | Published: May 13, 2016 1:03 AM