- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या सामान्य रुग्णांवर माेफत आणि तातडीने उपचार मिळण्यासाठी ससून रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी विभाग तातडीने कार्यान्वित हाेणे गरजे आहे. खासगी रुग्णालयांतील उपचारांचे लाखाेंचे दर पाहता, गरीब रुग्णांना तेथील सेवा घेता येत नाही. परिणामी, गंभीर आजारही अंगावर काढण्याशिवाय पर्याय नसताे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या नुसत्याच गगनचुंबी इमारत उभारून चालणार नाही, तर उपचारही हायटेक द्यावे. यासाठी सुपरस्पेशालिस्ट डाॅक्टर उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. ससून रुग्णालय ही सेवा तातडीने देईल, अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आहे.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरविणारे सर्वाेपचार रुग्णालय अशी ख्याती असलेल्या ससून रुग्णालयातील ‘सुपरस्पेशालिटी’चे विस्तार रखडले आहे. येथील मेडिकल आणि शल्यचिकित्सा विभागाचे मिळून ९ ‘सुपरस्पेशालिटी’ विभागांचे पदनिर्मिती व विस्तारीकरण सुरू झाले नाहीत. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्षानुवर्षे वारंवार पाठपुरावा करूनही या विस्ताराला मुहूर्त मिळत नाही.
प्रसंग १
घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. अशातच हृदयाचे ठाेके अनियंत्रित हाेण्याचा आजार जडला. सतत जाणवणार हा त्रास कायमचा दूर व्हावा, यासाठी ३५ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ससून रुग्णालयात आली. तिला ‘इपी’ ही प्राेसिजर करायची हाेती. त्यासाठी कार्डिओलाॅजिस्ट आवश्यक असून, ताेच ससूनमध्ये नसल्याने उपचार कसा घ्यायचा, हा प्रश्न तिला सतावू लागला. जर नियाेजित ‘कार्डिओलाॅजी सुपरस्पेशालिटी’ विभाग पूर्ण झाले असते, तर संगीताचा हा आराेग्याचा प्रश्न लगेचच सुटला असता.
प्रसंग २
अवघ्या ५ वर्षांच्या समीरच्या (नाव बदललेले) हृदयाला जन्मत:च छिद्र आहे. त्याची शस्त्रक्रियाही रखडलेली. अत्याधुनिक सेवासुविधा आणि तज्ज्ञ डाॅक्टर ससूनमध्ये उपलब्ध नसल्याने त्याला वेळेवर हृदयाचे उपचार मिळविण्यात अडचणी येत आहेत. ‘कार्डिओलाॅजी सुपरस्पेशालिटी’ विभाग कार्यान्वित झाल्यास वेळेत उपचार मिळू शकतील.
प्रसंग ३
आतड्यांच्या समस्याने त्रस्त असलेला, सामान्य कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा उपचार घेण्यासाठी संगमनेरवरून ससून रुग्णालयात आला. त्याची विष्ठा इतर ठिकाणावरून काढण्यात आली हाेती. ती पूर्ववत करण्यासाठी ताे ससूनमध्ये आलेला; परंतु बाळांचे शल्यचिकित्सकच नसल्याने अखेर खासगी रुग्णालयात जावे लागले. तब्बल ८० हजार रुपये खर्च करून ही शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. अशा गुंतागुंतीचे उपचार वा शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात हाेत नाहीत; कारण येथील ९ सुपरस्पेशालिटी विभागांचा विस्तार हाेणे बाकी आहे.
या विभागांच्या विस्ताराची प्रतीक्षाच :
- पुणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा आहे. याच स्मार्ट पुण्यातील ससून रुग्णालयासारख्या नामांकित रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधांची वानवा आहे. या रुग्णालयात मेडिकल विभागाच्या कार्डिओलाॅजी, जठरांत्रमार्ग राेग विभाग (गॅस्ट्राॅइंटेराॅलाॅजी), मेंदूविकार (न्युरोलॉजी) व नेफ्राॅलाॅजी विभाग तर शल्यचिकित्सामध्ये असलेल्या हृदयशल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस), प्लास्टीक सर्जरी, मेंदुशल्यचिकित्सा (न्युराेसर्जरी), मूत्रविकार (युरोलाॅजी) व बालशल्यचिकित्सा (पेडियाट्रिक सर्जरी) या शल्यसुविधा काही अंशीच पुरविल्या जातात. कारण त्यासाठी स्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिस्ट मनुष्यबळाची पदेच मंजूर नाहीत.
- या विभागाचे श्रेणीवर्धन किंवा विस्तार अनेक वर्षांपासून रखडले आहे. हे विभाग पूर्ण ताकतीने सुरू होण्यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशी पदे भरणे आवश्यक असते. सध्या केवळ हे विभाग अध्यापक (लेक्चरर)च्या भरवशावर सुरू आहेत. या विभागांत गोरगरीब रुग्णांना सर्वसाधारण उपचार मिळतात. मात्र, ज्यांना उच्च स्वरूपाच्या उपचारांची गरज असते, ते रुग्ण यापासून वंचित राहतात. म्हणून ससूनमध्ये सुपर स्पेशालिटी हे सध्या दिवास्वप्नच राहिले आहे. याच पुण्यात खासगीमध्ये मात्र, सुपरस्पेशालिटीचे इमले चढत आहेत.
काय आहे इतिहास?
- समाजातील गोरगरीब रुग्णांना उच्च दर्जाचे (टर्शरी केअर) उपचार मिळावे या हेतूने १८६७ साली डेव्हिड ससून यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून ससून रुग्णालयाची उभारणी झाली. कालांतराने त्यात अधिकाधिक सुविधांची भर पडत गेली. रुग्णालयात विविध विभाग स्थापन झाले आणि आधुनिक वैद्यक घडवणाऱ्या बीजे मेडिकलचीही स्थापना झाली. मात्र, वाढत्या गरजांच्या प्रमाणात येथे दिल्या जाणाऱ्या सुपरस्पेशालिटी सेवा उन्नत झाल्या नाहीत व हे वास्तव स्वीकारायला शासन तयारच नाही.
वस्तुस्थिती काय?
- ‘ससून’शी संलग्न असलेल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमही सुरू होणे आवश्यक आहे. कारण रुग्णालयात २४ तास निवासी डॉक्टर असतात.
- सुपरस्पेशालिटी विभागात हे निवासी डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून सन १९८५ साली प्लास्टिक सर्जरी व हृदयरोग शल्यचिकित्सा विभाग स्थापन करण्यास तत्कालीन मेडिकल काउंसिलने मान्यता दिली होती. मात्र, मनुष्यबळाअभावी प्लास्टिक सर्जरी विभाग सुरू झाला नाही.
- हृदयरोग शल्यचिकित्सा विभाग सुरू झाला खरा; पण काही वर्षांनी तेथेही पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सुपरस्पेशालिटीच्या एमसीएच अभ्यासक्रमाला मिळालेली मान्यता देखील रद्द झाली.
पूर्णवेळ अध्यापकांअभावी विभाग बंद पडण्याचा मार्गावर :
डॉ. अजय चंदनवाले हे अधिष्ठाता असताना मोठा गाजावाजा करत दोन-तीन सुपरस्पेशालिटी विभाग सुरू झाले. मात्र, एमसीएच या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमास मान्यता मिळालेले प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी विभागही पूर्णवेळ अध्यापकांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सरकार दखल घेईल का?
सुपरस्पेशालिटी विभागात अध्यापकांची पदे मंजूर नसणे ही गोरगरीब रुग्णांच्या आशेचे स्थान असलेल्या 'ससून'साठी मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल. केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे व दिरंगाईमुळे सर्वसामान्य लोक सुपरस्पेशालिटी सुविधांपासून वंचित राहत आहेत, याची दखल मायबाप सरकार घेईल का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
संबंधित सुपरस्पेशालिटी विभागाच्या विस्तारीकरणाची फाईल मंजुरीसाठी पाठविली आहे. या विभागाचे पाेस्ट ग्रॅज्युएट काेर्सेसही आपल्याकडे आहेत. परंतु हे विभाग नसले तरी ससून रुग्णालयात संबंधित काही शस्त्रक्रिया किंवा उपचार हाेतात.
- डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय