पुणे : पृथ्वीतलावरील देव असे डॉक्टरांना संबोधले जाते. अशा देवतुल्य व्यवसायात काम करणाऱ्या महिला डाॅक्टरने रुग्ण महिलेला कॅन्सर झाल्याचे सांगून एका महिलेला तब्ब्ल दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. विद्या धनंजय गोंद्रस (रा. वानवडी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी एका ५८ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीने उपचारासाठी पगारातून केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंड, मुदत ठेवी, पोस्टातील ठेवी, घरभाडे तसेच पतीच्या व्यवसायातून बचतीतील सर्व पैसे असे १ कोटी ४७ लाख ५८ हजार रुपये डॉक्टरला दिले. यानंतरही डॉक्टरने पैशाचा तगादा लावल्यावर रुग्ण महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
फिर्यादी या संरक्षण खात्यात ऑडिटर म्हणून कार्यरत आहे.त्यांची एका मैत्रिणीमार्फत डॉ.विद्या यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान फिर्यादींना अर्धशिसी व गुडघेदुखीवर २०१७ मध्ये डॉ.विद्या यांच्याकडे उपचार घेतले होते. तर २०१९ मध्ये त्यांना अन्न नलिकेचा त्रास होत असल्याने त्यांनी डॉ.विद्या यांच्याकडे संपर्क साधला होता.
विद्या यांनी आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदिक संस्थेची फ्रेंचाईस घेतली असून त्याचा शहरातील अनेक रुग्णांना लाभ झाला असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना व्हॉटसअपवर नाभीचा फोटो पाठवायला सांगितला होता. तो फोटो कॅनडातील संस्थेकडे पाठवून रिपोर्टमध्ये लिव्हर असायटीस कॅन्सरची गाठ झाल्याचे सांगितले. रुग्णाला अथवा कुटुंबियांना रिपोर्ट गोपनीय असल्याने पूर्ण बरे होऊपर्यंत दाखवत नसल्याचे सांगत उपचार सुरु करण्यास सांगितले. लवकर उपचार सुरु न केल्यास तुमच्या पोटात पाणी होऊ शकते, त्यामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भितीही घातली. यामुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी तातडीने पैसे भरत उपचार सुरु केले. तुम्हाला कॅनडातील पद्धतीनुसार उपचार देण्यात येत असल्याने कॅनडाच्या चलनाप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्यास सुरुवात केली. त्यांना फक्त गोळ्या देण्यात येत होत्या. यानंतर २०२० मध्ये पुन्हा नाभीचा फोटो पाठवायला सांगून लिव्हरच्या वरच्या भागात कॅन्सरची गाठ आल्याचे सांगितले. यासाठी ७ लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र फिर्यादीकडील सर्व पैसे संपल्याने त्यांनी पतीकडे पैसे मागितले. पतीने पैशाबाबत विचारणा केली असता, त्यांनी उपचाराबाबत माहिती दिली. पतीने आजाराची कागदपत्रे व रिपोर्ट मागितले असता डॉ.विद्या यांनी ते दिले नाहीत. यामुळे त्यांचा संशय बळावल्याने त्यांच्या पतीने एका वकिलासह डॉ.विदया यांची भेट घेतली. यावेळी डॉ.विद्या यांनी आजार बरा झाल्याशिवाय रिपोर्ट देता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस उपनिरीक्षक अहिवळे अधिक तपास करत आहेत.
.........याबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही ती तातडीने दाखल करुन या डॉक्टर महिलेचा शोध घेतला. त्यांनी आपण आजारी असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
क्रांतीकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे.