भिगवण : रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ हायस्कूलने शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशात अचानक बदल केल्याने पालकांत आणि विद्यार्थ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. ड्रेसच्या कलरविषयी योग्य माहिती न मिळाल्यामुळे विद्यार्थी, पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या बदलाचे युग असल्यामुळे आणि खासगी शाळांचा बाजार मोठ्या प्रमाणावर चालू असल्यामुळे त्या स्पर्धेत आपले विद्यार्थी मागे राहू नयेत. या बाबीचा विचार करून रयत शिक्षण शाळेच्या स्कूल कमिटीने ५ वी ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय घेताना त्यांनी पालकांचा विचार घेतला नाही. तसेच हा गणवेश बदल करावयाचा, याची माहिती विद्यार्थ्यांना पाठीमागील शैक्षणिक वर्षात दिली नाही. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. गणवेशाची उपलब्धता होण्यास बराच वेळ जाणार असल्याची शक्यता आहे. भिगवण शाळेत विद्यार्थ्यांचा पट १५०० च्या वर असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस मिळण्यास किती दिवस लागतील, याची माहिती ज्या दुकानास काम दिले आहे देता येत नाही. तसेच ड्रेसचा कलर किंवा पॅटर्न याबाबत शाळेत एखादा गणवेश शाळेने प्रदर्शित करण्याची गरज असताना त्याबाबत शाळा प्रशासन कोणतेही उत्तर देताना दिसत नाही. १० वीच्या विद्यार्थ्यांना ड्रेसबाबत विचारले असता ड्रेस बदलला आहे. परंतु, तो कोणता असेल याची माहिती त्यांना देता आली नाही. तसेच शाळेने आपल्या गुणवत्तेत फरक करण्याऐवजी गणवेशात बदल करण्याची गरजच काय, असे मत पालकांनी व्यक्त केले. तसेच याआधीचा खाकी-पांढरा गणवेश सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे त्यात बदल केल्याने नवीन ड्रेस ठराविक दुकानात मिळणार असल्यामुळे त्याची किंमत जास्त असण्याची भीतीही पालकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांच्या गणवेश बदलाने नाराजी
By admin | Published: June 20, 2016 1:01 AM