पुणे : रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी व बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने शंभर टक्के रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या योजनेला रेशन दुकानदारांकडूनच खोडा घातली जात आहे. दोन महिन्यात केवळ ३ लाख ६८ हजार रेशनकार्डचे आधार लिंक झाले आहे. रेशन कार्ड आधार लिंक करण्यासाठी ३१ जुलै ही अखेरची मुदत असल्याने दोन दिवसांत १३ लाख रेशनकार्ड आधार लिंक होणार का हा प्रश्नच आहे.शिरूरमधील ५ गावांत धान्याचे वाटप करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धती अवलंबली होती. अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. ते देताना सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेत रेशनिंगचे संगणकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. धान्यवाटपात बायोमेट्रिकचा अवलंब केल्यामुळे वीस टक्के धान्याची गळती रोखण्यास यश आले. स्वस्त धान्य दुकानात व्यवहारांचे व्यवस्थापन संगणकाद्वारे करताना रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना बायोमेट्रिक ओळख पटवूनच धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिलांकडे बॅँक, आधार क्रमांक नाहीबायोमेट्रिक धान्य वाटप व आधार लिकिंगमुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. यामुळे राज्यात रेशनकार्ड आणि आधार क्रमांक लिकिंग मोहीम सुरू आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणारी अपमानस्पद वागणूक व रेशनकार्ड धारकांचे अर्ज व कागदपत्र हरवण्याचे प्रकार होत आहेत. अनेक कटुंबातील महिलांकडे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक नसणे तसेच नवविवाहित महिलेचे सारसरचे व माहेरचे नाव वेगळे असणे, यामुळे रेशनकार्ड आधार लिकिंगचा अर्ज भरून देण्यास अडचण निर्माण होत आहे. शुभ्र रेशनकार्ड धारक रेशनचे धान्य घेत नाही. यामुळे स्वस्त धान्य दुकान कुठे आहे याची माहिती अनेकांना नाही. यासर्व प्रकारामुळे रेशनकार्ड आधार लिकिंगला अल्प प्रतिसाद मिळत आहे.(प्रतिनिधी)
रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिकिंग करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश दिले आहेत. रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी पैसै घेणे, नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.- ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी