पुणे : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून, दिवसेंदिवस पाणी टंचाईबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यासंदर्भातील मागणी आहे. मात्र, त्यातील नऊ ठिकाणी चारा छावणी सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल स्थानिक तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यासाठी नकार घंटा वाजवली जात असल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनातर्फे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये, १८ महसूल मंडळात आणि ८८ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून प्रामुख्याने बारामती व शिरूर तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसत आहे. सध्या बारामतीमध्ये २१ आणि शिरूरमध्ये १७ टँकर सुरू असून याच तालुक्यातून चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली जात आहे. चारा छावण्यांसाठी आत्तापर्यंत वैयक्तिक व सामूहिक असे एकूण १३ अर्ज आले होते. त्यातील नऊ ठिकाणी चारा छावणी आतातरी सुरू करण्याची गरज नाही, असा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे.>पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पशुधनजिल्ह्यात परतीचा पाऊस पडलाच नाही.त्यामुळे चारा पिकात मोठी घट झाली आहे.त्यातच पुणे जिल्ह्यात सध्या लाख ५४ हजार ७०३ मोठे पशुधन आणि तर ६ लाख ९८ हजार ६३२ शेळ्या मेंढ्या आहेत.त्यांना एका महिन्याला १ लाख ७२ हजार ८० मेट्रिक टन चा-याची आवश्यकता आहे. मार्च महिना अखेरपर्यंत सर्व पशुधनास चारा पुरेल असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू केल्या जात नाहीत.पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून पुण्यासह राज्यात चारा उत्पादित केला जात आहे.शेतक-यांना बियाणे आणि अनुदान देवून गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पिके घेण्यात आली आहेत.मात्र,दुष्काळी भागात पाणी नसल्याने चा-याचा तुटवडा जाणवू लागला आहे.त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि गाळपे-यातून उपलब्ध होणार चारा यांचा विचार केल्यास जिल्ह्यात सध्यस्थितीत चारा छावणी सुरू करण्याची गरज नाही,मात्र,येत्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी सुरू कराव्या लागतील,असे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
चारा छावण्यांना नकार घंटा, प्रशासनाने केले हात वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:22 AM