पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत येते, आजवरच्या सर्वच सरकारने या रुग्णालयासाठी मदत केलेली आहे. गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ सरकारने तातडीने बरखास्त करावे, हे रुग्णालय ताब्यात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ते चालवावे, तसेच रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. सपकाळ यांनी शुक्रवारी भिसे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीनंतर कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, भिसे प्रकरणात तीन-तीन अहवाल तयार करून सरकार दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या रुग्णालयाने धर्मादाय आयुक्तांच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे येथे नागरिकांची लूट केली जाते. रुग्णालयाचे प्रशासन एका राजकीय पक्षाच्या तालावर नाचते. त्यामुळे सरकारने रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करून रुग्णालय ताब्यात घ्यावे, तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून करावी. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुुटेज आणि संबंधितांच्या मोबाइलचे सीडीआर तपासावेत, अशीही मागणी सपकाळ यांनी केली. मंगेशकर कुटुंबाला आजवरच्या सर्वच सरकारने मदत केली आहे. लता मंगेशकर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विलासराव देशमुख यांनी उड्डाणपूल रद्द केला. तेव्हा उड्डाणपूल रद्द केल्यामुळे लोकांना आजही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, असेही ते म्हणाले.
सपकाळ असेही म्हणाले, सरकारकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे नाही, चालकांच्या पगारासाठी पैसे नाही, ठेकेदारांची बिले देण्यासाठी पैसे नाहीत, त्यांच्याकडे फक्त आमदारांचे लाड पुरविण्यासाठी पैसे आहेत. सरकार आर्थिक दिवाळखोरीकडे जात आहे, त्यामुळे अजित पवार यांनी केंद्रातील शक्तींकडून पैसा आणला. खोटे बोलून सत्तेवर आलेल्या सरकारने कॉंग्रेसने उभ्या केलेल्या संस्था विकल्या, आता त्यांचा डोळा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे. मोदी सरकारचा डोळा पद्मनाभन मंदिराच्या खजिन्यावरही जाईल. देशावर संकट असताना पंतप्रधान अहंकारामुळे कोणाशी चर्चा करत नाहीत. काही मंत्र्यांंना करमणुकीचे काम दिले आहे.