इंदापूर: मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरुन बडतर्फ केलेल्या प्रदीप गारटकरांना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याच पदावर गारटकर यांची नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार व मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सहकाऱ्यांच्या २ जुलै रोजी झालेल्या शपथविधीसाठी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले होते. या कृत्याचा ठपका ठेवत मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याच दिवशी गारटकरांची ही कृती पक्षाची शिस्त मोडणारी व पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून तातडीने बडतर्फ केल्याचे पत्र काढले होते. मात्र दि. ७ जुलैला अजित पवार यांना पाठिंबा देण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या दिवशी बडतर्फ करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतरच्या चारच दिवसांनी आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र देऊन गारटकर यांना तेच पद पुन्हा बहाल केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट टाकली. गारटकर यांचे अभिनंदन केले आहे.