Kasba Vidhan Sabha: रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:08 PM2024-11-11T13:08:46+5:302024-11-11T13:09:50+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्चमर्यादा २८ लाख होती, ती आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची पहिली फेरी पार पडल्यानंतर दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली आहे. त्यानुसार महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात येणार आहेत.
पहिल्या निवडणूक खर्च फेरीनुसार भाजपच्या रासने यांनी आतापर्यंत २ लाख ६९ हजार ८८२ रुपये इतका खर्च दाखविला आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्टरमध्ये खर्चाच्या तपशिलात हा खर्च ३ लाख ६० हजार ३८ रुपये दाखविण्यात आला आहे. या खर्चात ९० हजार १५६ रुपयांची तफावत आढळली आहे. दुसरीकडे धंगेकर यांनी आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८७३ रुपये इतका प्रचाराचा खर्च झाल्याचे दाखविले आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील खर्चाच्या तपशिलानुसार हा खर्च ४ लाख ७६ हजार ८६६ रुपये इतका आहे. यात १ लाख १६ हजार ९९३ रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे त्यांनाही नोटीस देण्यात येणार आहे.
निवडणूक खर्चात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावल्या जातात. खर्चातील तफावत मान्य केल्यास तो उमेदवाराच्या खात्यात समाविष्ट केला जातो. उमेदवाराने खर्च अमान्य केल्यास त्याबाबत जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा खर्च व्यवस्थापन समितीपुढे सुनावणी घेतली जाते. या समितीत मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूूक खर्च व्यवस्थापन समन्वय अधिकारी यांचा समावेश असतो. निवडणूक खर्चाची तपासणी करण्यासाठी दुसरी फेरी १३ व १४ नोव्हेंबर; तर तिसरी फेरी १७ व १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबरला सायंकाळी ६:०० वाजता प्रचार संपणार असल्याने त्यावेळेपर्यंत उमेदवारांना खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत तब्बल १२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्चमर्यादा २८ लाख होती. ती आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे.