भिगवण : पुण्याहून कर्नाटककडे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेची भिगवण येथील दवाखान्याने दरवाजा न उघडल्याने रस्त्यावरच प्रसूती होण्याची घटना घडली. तरीही या ठिकाणी खासगी रुग्णवाहिका मालक केतन वाघ आणि लाईफ लाईन हॉस्पिटलच्यामहिलाडॉक्टर योगिता भोसले यांनी देवदूताची भूमिका निभावली. महिलेची सुखरूप सुटका करीत माणुसकी जिवंत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण दिले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, सदरची गर्भवती महिला नातेवाइकांसह खासगी ट्रॅव्हल वाहनाने कर्नाटक कडे जात होती. मध्यरात्री भिगवण परिसरात पोहोचताच महिलेला त्रास सुरु झाला. वेळ रात्रीची २ वाजताची असल्यामुळे यावरील चालक आणि वाह्का समोर महिलेला उपचारासाठी कोठे सोडायचे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र गाडी सागर हॉटेल समोर उभी करताच त्यांना शेजारी असणाऱ्या हॉस्पिटलचा बोर्ड दिसला. त्यामुळे त्यांना हायसे वाटून त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या नातेवाइकांना त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देत पुढील प्रवास सुरु केला. नातेवाईकांनी त्या महिलेला उचलून हॉस्पिटल समोर जावून दरवाजा वाजविला आणि हाकाही मारल्या. परंतु दवाखाना उघडला गेला नाही. तर येथील काही उपस्थित नागरिकांनी १०८ या नंबर वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचाही संपर्क होवू शकला नाही. याची माहिती भिगवण आणि परिसरात रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या केतन वाघ यांना मिळाली. यावेळी केतन यांनी तातडीने या ठिकाणी जावून महिलेला मदत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र महिलेची परिस्थिती बिघडू लागल्याने केतन वाघ यांनी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉक्टर भोसले यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. डॉक्टर भोसले या काही वेळातच या ठिकाणी पोहोचल्या तोपर्यंत महिलेला वाढलेल्या त्रासामुळे डॉक्टर भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावरच नातेवाईक महिलाच्या मदतीने बाळंतपण केले. त्यामुळे बाळाची आणि महिलेची सुखरूप सुटका झाली. बाळ आणि मातेची सुखरूपपणे सुटका झाल्यावर केतन वाघ यांनी त्या महिलेला आणि त्या बाळाला लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये आणून पुढील उपचारासाठी दाखल केले.
गर्भवती महिला आणि नातेवाईक कर्नाटकी असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसली तरी सुधा देवासारखी धावून आलेल्या डॉक्टर आणि केतन वाघ यांचे त्यांनी हात जोडून आभार मानले.