कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक नोकरदारवर्गांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीजजोड बंद करताना वीजग्राहकांची अडचण काय आहे, ती बाजू समजून घेतली पाहिजे. थकीत वीजबिल ग्राहकांनी भरले पाहिजे, मात्र त्यासाठी महावितरण कंपनीनेही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यामध्ये हडपसरच्या काही भागामध्ये दोन दिवस विद्युतपुरवठा खंडित होता, त्यावेळी तक्रार केली, तर कोणीही तातडीने दखल घेण्यासाठी आले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी डीपी उघड्या आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, त्याकडे महावितरणचे अधिकारी का लक्ष देत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महावितरण वीज कंपनीकडून थकित वीजबिल वसुली करण्यापूर्वी १५ दिवसअगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, तसे न करता वीजजोड बंद केले जात आहेत. त्यामुळे वीजग्राहक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. शिवीगाळ तर काही ठिकाणी हाणामारीचे प्रकार होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी वीजबिल ग्राहकांना समजून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------
--