पुणेे महापालिकेत चाललंय काय ? गटनेत्यांची भांडणे पोलिसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 08:13 PM2018-05-23T20:13:14+5:302018-05-23T20:13:14+5:30
राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात काय चालले आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत निवडून दिलेल्या गटनेत्यांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असून राजकीय वादाला आता वेगळेच स्वरूप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात काय चालले आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत निवडून दिलेल्या गटनेत्यांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असून राजकीय वादाला आता वेगळेच स्वरूप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी झालेल्या महापालिकेतील सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली. यावेळी भीमाले यांनी रौद्ररूप धारण केले होते.त्यानंतर महापौर मुक्ता टिळक आणि इतर गटनेत्यांनी हस्तक्षेप केल्यावर हा वाद संपले असं वाटत असताना नवे वळण मिळाले आहे. शिंदे यांनी भाजप गटनेत्याने माझी बदनामी केली असून त्यांच्यावर अब्रू नुकसानी केल्याबद्दलचा गुन्हा दाखल व्हावा असे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिले आहे. त्यामुळे केवळ राजकीय आखाड्यात दिसणारे हे भांडण कायदेशीर लढाईत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदे यांना इतर पक्षांनीही साथ दिली असून मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तर महापौरांना भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भिमाले यांच्या संदर्भात आलेल्या कटू अनुभवासह इतरही काही मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो. पण सभागृहनेत्यांची वागणूक कायम आम्हा गटनेत्यांसोबत वादाची राहिली आहे. जर आमचे काही चुकत असेल तर चुका दाखवा आम्ही माफी मागू असेही त्यांनी विनम्रपणे नमूद केले आहे.
याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे यांनीही या वादात उडी घेतली असून भिमाले यांच्या वागण्याचा निषेध केला आहे. त्यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात सभागृह नेता हा सर्व सभासदांचा नेता असतो. मोठ्या भावाप्रमाणे त्याची वागणूक असायला हवी असे म्हटले आहे. या सभागृहात अनेक वाद-प्रतिवाद झाले आहेत, पण सोमवारचा वाद हा शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या सभागृहाची अप्रतिष्ठा करणारा आहे या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
संभाजी ब्रिगेड संघटनेनेही सभागृह नेत्याची असभ्य दादागिरी, सुसंस्कृत पुण्यात खपवून घेतली जाणार नाही या आशयाचे पत्र आयुक्तांना दिले आहे. शिंदे यांच्या विरोधात पुरावे नसतील तर भिमाले यांनी सभागृहाची माफी मागावी. असे झाले नाही तर त्यांच्या विरोधात महापौर आणि आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.