पुणे : बिर्याणीवरून वाद झाल्याच्या घटना यापूर्वीही पुण्यात घडल्या आहेत. तो वाद संपतो न संपतो तोच पुन्हा एकदा पुण्यात भांडण झालंय आणि त्याला कारणीभूत ठरली बिर्याणी. बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हडपसर परिसरातील बोराटे नगरमध्ये गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश समाधान कोलगे (वय 23), विनायक परशुराम मुरगंडी (वय 21) आणि शुभम हनुमंत लोंढे (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मैनुद्दीन जलील खान (वय 42) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील काळे बोराटे नगर परिसरात फिर्यादीचा केटरिंगचा व्यवसाय आहे. या ठिकाणाहून ते बिर्याणी आणि इतर खाद्यपदार्थ पार्सल देण्याचा व्यवसाय करतात. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीकडून बिर्याणी पार्सल घेतली. फिर्यादीने बिर्याणीचे पैसे मागताच आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने त्यांना मारहाण केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून दुकानातील टाइल्स फोडून नुकसान केले. दरम्यान याप्रकरणी तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत.