लोणी काळभोर : गाडी पार्क करण्याच्या कारणांवरून झालेल्या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्याने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांंना जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ८ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यातील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऋषभ रामदास शेवाळे ( वय २२, रा शेवाळेवाडी, उरुळी देवाची ता. हवेली ) व संकेत सदाशिव पाटील ( वय २१, मूळ रा. इरला, ता. जि उस्मानाबाद. सध्या रा.ससाणे नगर, हडपसर, पुणे. ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१०) दुपारी वाघोली गावच्या हद्दीतील बकोरी फाटा येथे सुनिल रामदास गाडे ( वय ३१, कॅनरा बँकेच्या मागे, बायफ रोड, वाघोली ) हे आपल्या गॅरेजजवळ गाडी घेऊन आले असता तेथे अगोदर उभा असलेला टेम्पो बाजूला काढण्याच्या कारणावरून टेम्पो चालक व गाडे यांच्यात किरकोळ भांडण झाले. त्याचा राग मनात धरून टेम्पो चालकाने आपले मित्रांना तेेेथे बोलावत गाडे व भाऊ समीर आणि त्यांच्या मित्रांना कोयते, लाकडी दांडक्याने मारण्यास सुरवात केली. भांडणे सोडवण्यास आलेले गाडे यांचे बहिणीचे पती संतोष सातव यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. भांडण करण्यासाठी आलेल्या व्यक्तींपैकी एकाने गावठी पिस्तुल काढून सातव यांच्यावर २ वेळा गोळीबार केला. यामध्ये समीर गाडे व त्यांचे मित्र इरफान शेख हे गंभीर जखमी झाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,सापळा रचून ऋषभ शेवाळे व संकेत पाटील यांना जेरबंद केले. केलेल्या चौकशीत सदरचा गुन्हा इतर साथीदारांमार्फत केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ऋषभ शेवाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर लोणी काळभोर, विनवणी व हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गेल्या ३ महिन्यांपूर्वी तो येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर सुटलेला आहे. दोघांनाही लोणीकंद पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत.