पुणे : लोकभारतीचे आमदार व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्यावर मनमानी कारभाराचा गंभीर आरोप सेवा दलाच्या माजी अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच निषेध म्हणून मिळालेले पुरस्कार देखील परत केले आहे.
पुण्यात राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी सोमवारी(दि. ९) क्रांती दिनाच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी सेवादल सैनिक मिहीर थत्ते, सुहास कोते, जीवराज सावंत आदी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, आमदार कपिल पाटील यांनी आपल्या मर्जीतील लोकभारती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सेवादलाचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच पाटील यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्र सेवादलाचा गैरवापर सुरू केला आहे. त्यांचा संघटनेतील हस्तक्षेप वाढला आहे. कधीही सेवादल सदस्य नसलेल्या गणेश देवी यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. पाटील यांनी देवींमार्फत बेकायदेशीरपणे राष्ट्र सेवा दल वर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा गंभीर आरोप देखील कांबळे यांनी यावेळी केला आहे.
आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कपिल पाटील यांनी अडचणीचे ठरतील अशा ज्येष्ठ सेवादल विश्वस्त व पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं बेकायदेशीरपणे निलंबन केलं. प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेबाहेर घालवलं. संघटनांर्तगत लोकशाहीचा व सेवादल संविधानाचा अनादर करत कपिल पाटील व गणेश देवी हे सध्या सेवादलात मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत,” असाही आरोप कांबळे यांनी केला.
देशातील लोकशाही, संविधान वाचविण्याची सदैव भाषा बोलणारे भाषातज्ञ गणेश देवी लोकशाहीविरोधी, मनमानी पद्धतीने काम करत आहेत. या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अडीच ते ३ दशके कार्यकर्ते असलेल्या सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आपले पुरस्कार परत करत आहेत असे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळालेल्या श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी सांगितले.
“कपिल पाटील कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रत्यक्ष बैठका टाळत आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा प्रभाव टाकत पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. यातून त्यांनी सेवादल सैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी राष्ट्र सेवा दलाचे स्वतंत्र, समाजवादी अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सर्व सेवादल सैनिक सनदशीर मार्गाने सेवादल वाचविण्याच्या आपला लढा सुरूच ठेवतील,” असंही या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले.