- राजू इनामदार । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अपात्र ठेकेदारालाच ठेका देण्याचा आग्रह धरल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात येणारी ९ कोटी रुपयांची वार्षिक औषधखरेदी दोन महिने रखडली आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने त्या ठेकेदाराला काम देण्याचा शब्द दिला असल्यामुळे ही स्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा साठाच नसून अनेक गरजू रुग्णांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.महापालिकेत शहरी गरीब योजनेतंर्गत नागरिकांसाठी व महापालिकेच्या कर्मचारी, माजी नगरसेवकांसाठी विनामूल्य औषधयोजना राबवण्यात येते. दरवर्षी निविदा मागवून ही औषधखरेदी करण्यात येते. साठा संपत आली, की नव्याने निविदा काढल्या जातात. काही महिन्यांपूर्वी औषध खरेदीसाठी अशाच दोन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापैकी एक निविदा ३ कोटी ६० लाख रुपयांची तर दुसरी ५ कोटी ५० लाख रुपयांची आहे. त्यातील तीन जण महापालिकेचे नेहमीचे पुरवठादार होते तर तीन जणांनी नव्यानेच निविदा दाखल केल्या होत्या. सर्वप्रथम ‘अ’ निविदा खुली करण्यात येते. त्यात निविदा दाखल केलेल्यांची पात्रता तपासण्यात येते. या पहिल्या फेरीतच ३ निविदा बाद झाल्या. चुकीची प्रमाणपत्रे, अनुभवासंबधीची खोटी माहिती दिल्यामुळे त्या बाद करण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली. या बाद झालेल्या निविदांसह पात्र निविदांचा तक्ता आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यांनी योग्य असा शेरा मारून पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे. मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने अपात्र असलेल्या ठेकेदारालाच हे काम मिळावे, यासाठी राजकीय दबाव टाकणे सुरू केले. काहीही करून त्याच ठेकेदाराला काम मिळावे, असा या पदाधिकाऱ्याचा आग्रह आहे. प्रशासनाला त्यांचे म्हणणे डावलणे अशक्य झाले आहे तर दबावापुढे झुकणे गैर असल्याने ते मान्य करणेही अडचणीचे झाले आहे. त्यातच तब्बल दोन महिने ही खरेदी रखडली आहे.गरजू रुग्णांना मिळेनात औषधेकर्करोग, कॅन्सर, त्वचारोग या आजारावरची औषधे महाग असतात. ती घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. रुग्णालयात औषधेच नसल्यामुळे मागील दोन महिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गरजू रुग्णांना परत पाठवावे लागत आहे. त्यात अनेक माजी नगरसेवक, महापालिकेचे विद्यमान कर्मचारी यांचाही समावेश आहे. गाडीखाना येथूनही ही औषधे महापालिकेच्या अन्य रुग्णालयांना वितरीत केली जातात व तिथून ती मागणीनुसार रुग्णांना दिली जातात. महापालिकेकडून औषधे मिळतच नसल्याने गरजू रुग्णांना खुल्या बाजारातून महागड्या दराने ही औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्यांच्याकडून वारंवार पाठपुरावा होत असूनही राजकीय दबावामुळे प्रशासनाला काहीही करता येत नाही.रुग्णालयात सध्या औषधांचा साठा नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्याला विलंब होत आहे. आता आलेल्या निविदांचा तुलनात्मक तक्ता वगैरे तयार झाला असून लवकरच स्थायी समितीची मंजुरी घेऊन पात्र ठेकेदारांना हे काम दिले जाईल. आवश्यक ती कार्यवाही यात विनाविलंब करण्यात येईल.- डॉ. सोमनाथ परदेशी, आरोग्य प्रमुख, महापालिका
अपात्र ठेकेदारामुळे रखडली औषधखरेदी
By admin | Published: May 28, 2017 4:05 AM