लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : तालुक्यातील इतर रुग्णालये चकाचक असताना राजगुरुनगर केंद्राची दुरवस्था झाली आहे. जेमतेम बाराशे चौरस फुटांत हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून इमारतीचे सिमेंट व कलरचे पोपडे पडत असून पावसाळ्यात ती गळत असते. रुग्णांसाठी सहा खाटा आहेत. स्वच्छतागृहाची संख्या अपुरी आहे. परिसरात अस्वच्छता आहे. दुसरे फिल्टर पाण्यासाठी नवीन मशीन आले असून बसविण्यास जागा नसल्यामुळे फिल्टर मशीन बॉक्समध्ये पडून आहे.राजगुरुनगर व परिसरातून किमान दीडशे जण दररोज उपचारासाठी येत असतात. त्यांना बसायला पुरेशी जागा नाही. आजारी अवस्थेत त्यांना तासन्तास उभे राहावे लागते. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांना बसावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच या रुग्णालयासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना सध्या एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत गर्भवती महिलांची रक्त, लघवी तपासणी केली जाते. या प्रयोगशाळेलगत गोळ््या, औषधे यांचे रिकामे बॉक्स व इतर वस्तू टाकण्यात आल्या आहेत. तसेच या इमारतीची दुरवस्था झाली असून ती गळत आहे. गोळ्या, औषधे व इतर वेगवेगळ्या लसी भिजून खराब होत आहेत.
राजगुरुनगर आरोग्य केंद्राची दुरवस्था
By admin | Published: June 10, 2017 1:49 AM